सफाई कर्मचाऱ्यांचे वारस नियुक्तीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:13 AM2021-03-20T04:13:52+5:302021-03-20T04:13:52+5:30
नाशिक रोड : येथील महापालिकेत सन २०१८पासून सफाई कामगारांच्या वारसांच्या नियुक्त्या प्रलंबित असून, महापालिकेने त्वरित कार्यवाही करुन त्यांना सेवेत ...
नाशिक रोड : येथील महापालिकेत सन २०१८पासून सफाई कामगारांच्या वारसांच्या नियुक्त्या प्रलंबित असून, महापालिकेने त्वरित कार्यवाही करुन त्यांना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याविषयी मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांच्या रिक्तपदी वारसा हक्काने सफाई कामगारांच्या वारसाला नियुक्त्या दिल्या जात आहेत. परंतु, नाशिक महापालिकेत कर्मचारी निवड समितीच्या शिफारसीनुसार नियुक्त्या दिल्या जातात. शासनाचे परिपत्रक उपलब्ध असतानाही सफाई कामगारांच्या नामनिर्देशित व्यक्तीला वारसाहक्काने नियुक्ती न देता त्यांची प्रकरणे निकाली काढून शासनाकडे मार्गदर्शन मागविण्याच्या नावाखाली प्रलंबित ठेवली जात आहेत. त्यामुळे सफाई कामगारांचे वारसदार नोकरीपासून वंचित राहात आहेत. महाराष्ट्रातील अन्य महापालिकांमध्ये रिपब्लिकन फेडरेशनने संपर्क साधून तेथील वारसाहक्काने सफाई कामगारांच्या नामनिर्देशित वारसा नियुक्त्या दिल्याचे पुरावे व नियुक्ती आदेश मिळवले. हे पुरावे नाशिक महापालिका प्रशासनाला दिले. शासनाचा निर्णय व परिपत्रकही दिले. फेडरेशनच्या या सर्व प्रयत्नांमुळे सन २०१८पासून वारसा हक्काने वंचित ठेवलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु, सन २०१८पासून नियुक्त्या देण्यापासून प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. नगरविकास विभागाचे १ मार्च २०२१च्या पत्रात महापालिकेला कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही कार्यवाही झालेली नाही. याप्रकरणी महापालिकेने त्वरित कार्यवाही करुन संबंधित वारसांना नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी फेडरेशनने केली आहे. या निवेदनावर रिपब्लिकन एम्प्लाॅईज फेडरेशनचे उपाध्यक्ष जगन्नाथ पगारे, नीलेश राठोड, राकेश सौदे, संतोष वाघ आदींची नावे आहेत.