जिल्हाधिकारी यांच्या सादरीकरणाने उपमुख्यमंत्री प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:16 AM2021-02-11T04:16:30+5:302021-02-11T04:16:30+5:30
जिल्हा सर्वसाधारण नियोजन आराखडा बैठकीत सर्वात आगोदर नाशिक जिल्ह्याची बैठक पार पडली. यामध्ये जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सादरीकरण ...
जिल्हा सर्वसाधारण नियोजन आराखडा बैठकीत सर्वात आगोदर नाशिक जिल्ह्याची बैठक पार पडली. यामध्ये जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सादरीकरण केले. त्यांच्या मुद्देसूद सादरीकरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. त्यानंतर झालेल्या अन्य जिल्ह्यांच्या नियोजन बैठकीप्रसंगी पवार यांनी नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या सादरीकरणाप्रमाणे प्रस्ताव मांडण्याच्या सूचना केल्या.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत प्रास्ताविक सादर करताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, कोविड महामारीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या निधीतील ८० टक्के निधी जिल्ह्यातील कोविड उपाययोजनांसाठी खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर हा राज्याच्या तुलनेत सर्वात कमी १.७६ टक्के असून, बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. तसेच १०० आयपास प्रणालीचा वापर करणारा नाशिक हा राज्यातील अग्रगण्य जिल्हा असून, या प्रणालीद्वारेच प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे ई-ऑफिस प्रणाली पाच शाखांमध्ये सुरू करण्यात आली आहे. २०२१-२२ वर्षाच्या नियोजनाचा आराखड्यात जिल्ह्याला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘वन फिफ्टी वन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शक्तिस्थळे जगासमोर आणण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी आपल्या सादरीकरणात सांगितले.