कृषी उपसंचालक नरेंद्र अघाव यांना एक लाखाची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 08:33 PM2020-03-03T20:33:09+5:302020-03-03T20:35:40+5:30
द्राक्षनिर्यातदारांना द्राक्षे निर्यात करण्यासाठी कृषी उपसंचालक कार्यालयाच्या सही शिक्क्यानिशी फायटो प्रमाणपत्राची गरज भासते. हे प्रमाणपत्र देण्याकरिता अघाव यांच्याकडून अनेकदा पैशांची मागणी केली जाते, अशा तक्रारी येत होत्या.
नाशिक : द्राक्षनिर्यातदारांना फायटो प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी उपसंचालक नरेंद्र अघाव यांच्याविरूध्द वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यांनी सुमारे पावणेदोन लाख रूपयांची मागणी एका द्राक्ष निर्यातदाराकडे केली होती. त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत सुचित केले. तक्रारीत तथ्य जाणवल्यानंतर विभागाच्या पथकाने कृषी उपसंचालक कार्यालयात सापळा रचला. मंगळवारी (दि.३) संध्याकाळच्या सुमारास अघाव यांना १ लाखाची रक्कम स्विकारताना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.
द्राक्षनिर्यातदारांना द्राक्षे निर्यात करण्यासाठी कृषी उपसंचालक कार्यालयाच्या सही शिक्क्यानिशी फायटो प्रमाणपत्राची गरज भासते. हे प्रमाणपत्र देण्याकरिता अघाव यांच्याकडून अनेकदा पैशांची मागणी केली जाते, अशा तक्रारी येत होत्या. त्यांच्याविषयी भ्रष्टचाराबाबतच्या चर्चाही अधुनमधून झडत होत्या. दरम्यान, त्यांनी एका निर्यातदाराकडे सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत त्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करत दाद मागितली. तक्रारीची चौकशी केल्यानंतर अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पथकाने सापळा रचला. अघाव यांना १ लाख रूपयांची रोख रक्कम तक्रारदाराकडून घेताना मंगळवारी संध्याकाळी त्यांच्याच कार्यालयात पथकाने रंगेहाथ पकडले. तडजोडअंती सुमारे दीड लाख रूपयांची लाच देण्याचे निश्चित झाले. त्यापैकी १ लाख रूपये त्यांनी तक्रारदाराकडून स्विकारचल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत अघावविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येत होता.