शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 01:01 AM2021-12-11T01:01:54+5:302021-12-11T01:02:15+5:30
नाशिक : विभागीय शिक्षण उपसंचालकपदी औरंगाबादचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब चव्हाण यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली असून त्यांनी माजी ...
नाशिक : विभागीय शिक्षण उपसंचालकपदी औरंगाबादचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब चव्हाण यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली असून त्यांनी माजी उपसंचालक नितीन उपासनी यांच्या गैरहजेरीत शुक्रवारी (दि.१०) तत्काळ शिक्षण उपसंचालक पदाचा पदभार स्वीकारला आहे. नितीन उपासनी यांची पदोन्नतीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळ अध्यक्षपदी त्यांची बदली झाली असून ते सोमवारी (दि.१३) पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
शिक्षण मंत्रालयाने प्रशासन शाखेतील शिक्षण उपसंचालक व समकक्ष अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदल्या केल्या असून त्यानुसार औरंगाबादचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब चव्हाण यांनाही पदोन्नती मिळाली असून त्यांनी बदलीचे आदेश मिळताच शुक्रवारी उपसंचालक पदाची सूत्रे हाती घेतली. नितीन उपासनी यांनी जून २०२० मध्ये नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्याकडे उपसंचालक पदाचा प्रभारी पदभार असताना त्यांच्या निलंबनानंतर ३० मार्च ते १६ एप्रिल या कालावधीत नितीन उपासनी यांच्याकडे हा पदभार राहिला. ३० एप्रिलपासून उपसंचालक कार्यालयातील अधिकारी पुष्पावती पाटील यांच्याकडे दिला होता. परंतु, महिन्याभरात पुन्हा शिक्षण उपसंचालकपदी उपासनी यांची फेरनियुक्ती झाली होती. दरम्यान, नाशिक माध्यमिक शिक्षण विभाग लाचखोरी आणि दप्तर दिरंगाईच्या विविध प्रकरणामुळे चर्चेत आला असताना नाशिकला नवीन शिक्षणाधिकारी मिळाले होते. आता शिक्षण उपसंचालकपदी ही नवीन अधिकारी रुजू झाल्याने आता शिक्षण विभागात कोणते महत्त्वपूर्ण निर्णय होतात, याकडे नाशिक जिल्हा व विभागातील शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कोविडनंतर आता शाळा सुरू होत आहे, शिक्षण विभागावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्याची महत्त्वाची जबाबदारी असून शासनाच्या प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करीत शाळा सुरू करण्यास प्राधान्य दिले जाईल.
- डॉ. भाऊसाहेब चव्हाण, शिक्षण उपसंचालक, नाशिक .