जमावाने नुकसान केलेल्या घटनास्थळाची उपमहानिरीक्षकांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 01:19 AM2021-11-17T01:19:35+5:302021-11-17T01:20:09+5:30
मालेगाव शहरात शुक्रवारी दगडफेकीचा प्रकार घडला होता. या दगडफेकीच्या घटनेत ११ लाखांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे मंगळवारी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी पाहणी केली आहे.
मालेगाव : शहरात शुक्रवारी दगडफेकीचा प्रकार घडला होता. या दगडफेकीच्या घटनेत ११ लाखांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे मंगळवारी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी पाहणी केली आहे. तसेच महसूल विभागाने पंचनामे पूर्ण केले आहे. दगडफेकीत नवीन बसस्थानकासह नऊ जणांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पंचनाम्यानुसार ११ लाख १२ हजार रुपयांची मालमत्तेची नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस उपमहानिरीक्षक शेखर यांनी मंगळवारी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर नवीन बसस्थानक परिसर, उड्डाणपूल परिसरातील नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली. यानंतर पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांच्या दालनात पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील कायदा व सुव्यस्थेचा आढावा घेतला. दगडफेक घटनेतील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. शहरात अटक सत्र सुरू करण्यात आले आहे. दगडफेकीतील संशयितांची तातडीने मुसक्या आवळणार असल्याचेही शेखर यांनी सांगितले.
-----------------------------
दगडफेकीत नुकसान झालेल्यांची नावे व नुकसानीची किंमत
शरीफ सुभान पठाण - ४० हजार, एटीएम (एचडीएफसी) - ३७ हजार, सहारा रुग्णालय - ३० हजार, राकेश वासुदेव अलई - २ लाख ६० हजार ५००, सुभाष जगन्नाथ पाचपुते - २ लाख ४६ हजार ५००, विजय उत्तम देवरे - ४१ हजार, गोविंद खुशालचंद प्रजापत - ८० हजार, उदयक्रिष्ण ऐथाल - ६ हजार, नवीन बसस्थानक - ३ लाख ७१ हजार.