पालकमंत्र्यांच्या निर्णयाला उपमहापौरांनी झिडकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:23 AM2017-11-01T00:23:54+5:302017-11-01T00:24:00+5:30
स्त्री रुग्णालयाचा वाद पूर्णपणे मिटला असून, आजी-माजी आमदारांची त्याबाबत आता कुठलीही तक्रार नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्यानंतरही माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि प्रभागाचे नगरसेवक व विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते यांनी स्त्री रुग्णालयाला जागा देण्यास आपला विरोध कायम असल्याचे म्हटले आहे.
नाशिक : स्त्री रुग्णालयाचा वाद पूर्णपणे मिटला असून, आजी-माजी आमदारांची त्याबाबत आता कुठलीही तक्रार नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्यानंतरही माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि प्रभागाचे नगरसेवक व विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते यांनी स्त्री रुग्णालयाला जागा देण्यास आपला विरोध कायम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांपाठोपाठ पालकमंत्र्यांचीही शिष्टाई असफल ठरली असून, गिते-फरांदे यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. शासन अनुदानातून साकारणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी महासभेने भाभानगर येथील जागा देण्याचा ठराव केल्यानंतर स्थानिक नागरिकांसह प्रभागाचे नगरसेवक व विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते यांनी जागा देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. स्त्री रुग्णालयाच्या जागेवरून विद्यमान भाजपा आमदार प्रा. देवयानी फरांदे व माजी आमदार वसंत गिते यांच्यात संघर्ष पेटला आहे. सोमवारी (दि.३०) जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर प्रथमेश गिते यांनी नागरिकांसह पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन रुग्णालयास जागा देण्यास विरोध दर्शविला होता. यावेळी पालकमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. मात्र, पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी सदर प्रकरणी वाद मिटल्याचे सांगत महापालिकेने निश्चित केलेल्या जागीच रुग्णालय होणार असल्याचे ठामपणे स्पष्ट केले. त्यामुळे गिते यांना पाऊल मागे घ्यावे लागल्याची चर्चा असतानाच वसंत गिते व प्रथमेश गिते यांच्यासह नागरिकांनी रुग्णालयास जागा देण्यास आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही परिस्थितीत सदर जागेत रुग्णालय होऊ दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिकाही गिते यांनी घेतल्याने सदर प्रकरण मिटण्याऐवजी आणखी पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष
मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी सदर जागेबाबत निर्णय देऊनही स्थानिक नगरसेवक व उपमहापौर प्रथमेश गिते आणि माजी आमदार वसंत गिते मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आमदार देवयानी फरांदे यांनी सदरचा प्रकल्प हा आता पक्षाचा असल्याचे सांगत पक्षावर सारी जबाबदारी टाकून दिलेली आहे. त्यामुळे पक्ष नेमक्या या प्रकरणाबाबत कोणती भूमिका घेतो, याकडे आता लक्ष लागून असणार आहे.
रुग्णालय होणार नाही
स्त्री रुग्णालयाच्या जागेचा वाद अद्याप मिटलेला नाही आणि भाभानगर येथे प्रस्तावित रुग्णालय आम्ही होऊ देणार नाही. ज्या जागेवर रुग्णालयाचे आरक्षण आहे तेथे खुशाल रुग्णालय बांधावे. पार्किंगच्या जागेत रुग्णालय होण्यास आमचा ठाम विरोध आहे. त्यासाठी आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे.
- वसंत गिते, प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा