कर्तव्यात कसूर; मग कारवाई का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:15 AM2021-03-27T04:15:25+5:302021-03-27T04:15:25+5:30
नाशिक : जिल्ह्यात निर्बंध लागू करतानाच अधिकाऱ्यांना अंमलबजावणीच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या होत्या. मात्र, काहींनी सोयीची भूमिका घेत ...
नाशिक : जिल्ह्यात निर्बंध लागू करतानाच अधिकाऱ्यांना अंमलबजावणीच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या होत्या. मात्र, काहींनी सोयीची भूमिका घेत सर्वकाही नागरिकांवरच सोडून दिले असेल तर अधिकारी म्हणून आपण कोणती जबाबदारी पार पाडली, असा सवाल उपस्थित करीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी यावेळी ठेवला.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ प्रशासकीय यंत्रणेच्या कारभाराबाबत संतप्त झाले. वाढती रुग्णसंख्या चिंता निर्माण करायला लावणारी असताना जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन होत नसेल तर त्यास केवळ नागरिक नव्हे तर अधिकारीदेखील जबाबदार असल्याचे त्यांनी सुनावले. कोरोनाला रोखण्यासाठी काही निर्बंध लागू करताना जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची देखील जबाबादारी निश्चित करून देण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होणे अपेक्षित होते; परंतु शहरात कुठेही यंत्रणा रस्त्यावर दिसत नसल्याचे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतची मर्यादा असताना त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी मनपा आणि पोलीस प्रशासनाची देखील आहे. मात्र, या यंत्रणा काम करीत नसल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. याबाबत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देखील जाब विचारला. यावेळी त्यांनी पेालीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांकडे बेाट दाखविल्याचे समजते. यावेळी या दोन्ही अधिकाऱ्यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालकमंत्र्यांचे समाधान झाले नाही. रस्त्यावर उतरून काम करण्याचा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
अधिकारी जागेवरून हलतच नसल्याचे सांगून त्यांनी संंबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारल्याचे देखील समजते. रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स कशी चालतात, याचा जाब त्यांनी पोलीस आयुक्तांना विचारला. उशिरा चालणाऱ्या हाॅटेल्सवरील कारवाईबाबत पोलीस आणि मनपा यांच्यात संभ्रम असण्याचे काहीच कारण नाही. दोहोंनी सामूहिक भूमिका घेऊन कारवाई करणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सुनावले. या दोन्ही यंत्रणेमधील गैरसमाजाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देखील त्यांनी जाब विचारल्याचे समजते.
--इन्फो--
आता तरी रस्त्यावर उतरा
अधिकारी केवळ कार्यालयात बसून राहणार असेल तर त्यांचे इतर अधिकारी तरी कसे कार्यतत्पर होणार, असा प्रश्न विचारत पालकमंत्री भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना आता तरी रस्त्यावर उतरून गर्दी नियंत्रणात आणण्याच्या सूचना केल्या. निर्बंधाचे उल्लंघन होत असताना कारवाईदेखील केली जाणार नसेल तर मग अधिकाऱ्यांचा जागेवरून हलवावे लागेल, असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिला.