सावरकर स्मारकात नळ असूनही पाण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 04:06 PM2018-12-06T16:06:05+5:302018-12-06T16:06:49+5:30
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भगुरला शासकीय स्मारक होऊन २० वर्षे झाले असून, या ठिकाणी भगुर नगर पालिकेने गेल्या अनेक वर्षापासून स्मारकाच्या पुढील भागात एक व मागच्या खोलीत एक असे दोन नळ कनेक्शन दिले आहे. तसेच पुरातन विभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी एक शौचालय बांधून त्यावर पाण्याची टाकी बसविली
भगुर : भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पवित्र जन्मस्थान स्मारकात येणाऱ्या पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याचे दोन कार्यान्वित असतानाही निव्वळ व्यवस्थापकांच्या उदासिनतेमुळे सावरकर भक्त आणि देश विदेशी पर्यटकांना पाणी पिण्यासाठी वणवण करावी लागत असून, विकतचे पाणी घेवून तहान भागवावी लागत आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भगुरला शासकीय स्मारक होऊन २० वर्षे झाले असून, या ठिकाणी भगुर नगर पालिकेने गेल्या अनेक वर्षापासून स्मारकाच्या पुढील भागात एक व मागच्या खोलीत एक असे दोन नळ कनेक्शन दिले आहे. तसेच पुरातन विभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी एक शौचालय बांधून त्यावर पाण्याची टाकी बसविली तसेच नळाला मोटार लावून पाणी भरण्याची सोय केलेली आहे. शिवाय पर्यटकांना पाण्यासाठी पुढील बाजूने एक हजार लीटरची दानशूरांनी टाकी ठेवली आहे. यापूर्वी स्मारकात व्यवस्थापन म्हणून पुरातन विभागाचे सचिव कुलकर्णी काम पाहात होते ते स्वत: या स्मारकात कुटुंबासह राहत होते. त्यावेळी ते सकाळी नगर पालिकेच्या नळाला पाणी आल्यावर भरून ठेवत असे तेव्हा पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची शौचालय अडचण येत नसे. परंतु त्यांची कोपरगाव येथे बदली झाली आणि त्याच्या जागी नवीन व्यवस्थापक सोमनाथ बोराडे आले. ते नाशिकरोड येथे राहतात व स्मारकाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ असल्याने ते सकाळी १० वाजेला स्मारकात येतात. मात्र भगुर नगरपालिकेकडून संपूर्ण गावाला दिवसातून एक वेळेस भरपूर पाणी पुरवठा पहाटे ४ ते सकाळी ९ वाजेपर्यंत होत असल्याने स्मारकात पिण्यासाठी पाणी कोणी भरून ठेवावे असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून पर्यटकांनाच नव्हे तर पुरातन विभागाला देखील विविध कार्यक्रमाच्या दिवशी बाहेरून विकतचे पाण्याचे जार आणावे लागते. वेळप्रसंगी नैसर्गिक विधीसाठी दारणा नदीच्या काठी जावे लागते. स्मारकात १३ खोल्या आहे यापैकी सर्व सुविधा युक्त राहण्यासाठी दोन खोल्या असुन यापुर्वीचे व्यवस्थापक कुटुंबासह राहून पर्यटकाना सुविधा देत होते. त्याप्रमाणे नवीन व्यवस्थापकाने स्मारकात राहून लक्ष घालावे मागणी सावरकर भक्त, पर्यटकांनी केली आहे.