सुनसान पार्किंग; लख्ख प्रकाश
By admin | Published: September 8, 2015 11:51 PM2015-09-08T23:51:46+5:302015-09-08T23:52:28+5:30
विजेचा अपव्यय : महापालिकेचे दुर्लक्ष
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी प्रमुख मार्गावर करण्यात आलेल्या बाह्य वाहनतळावर सध्या सामसूम असूनही शेकडो विद्युत दिव्यांचा प्रकाशझोत रात्रभर कायम असून, त्यातून विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असतानाही महापालिकेने त्याकडे दुर्लक्षाची भूमिका घेतली आहे.
पर्वणीसाठी बाहेरगावच्या भाविकांची वाहने गावाबाहेरच उभी करून त्यांना तेथून अंतर्गत वाहनतळापर्यंत आणण्यात येणार आहे. शहराला जोडणाऱ्या अशा मुख्य राष्ट्रीय, राज्य मार्गावर आठ ठिकाणी बाह्य वाहनतळ उभारण्यात आले असून, या ठिकाणी भाविकांसाठी निवाराशेड, शौचालय, मुतारी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य केंद्र, माहिती केंद्र उघडण्यात आले आहेत. साधारणत: बांधा, वापरा व हस्तांतर करा (बीओटी) या तत्त्वावर सदरचे वाहनतळ विकसित करण्यात आलेले असून, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर विजेची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनतळावर दोनशेहून अधिक हायमास्ट बसविण्यात आलेले आहे. पहिल्या पर्वणीला भाविकांना अगदीच अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे वाहनतळाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराचे नुकसान झाले, मात्र पहिल्या पर्वणीपासून दररोज रात्री शेकडो दिव्यांनी वाहनतळ लख्ख प्रकाशात न्हावून निघत आहे. (प्रतिनिधी)
नसता भुर्दंड
सध्या या वाहनतळावर कोणीच वास्तव्यास नसून, फक्त सुरक्षारक्षक देखरेख करीत आहेत, तरीही दररोज शेकडो युनिट विजेचा अपव्यय केला जात आहे. पर्वणीच्या काळात विजेचा वापर करण्यास हरकत नाही, पण पर्वणीनंतरही तीच परिस्थिती कायम ठेवून नसता भुर्दंड महापालिका सोसत आहे.