वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय इमारतीचा आराखडा तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:11 AM2021-06-20T04:11:38+5:302021-06-20T04:11:38+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाची इमारत व महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन ...
जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाची इमारत व महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेने केलेल्या कार्यवाहीचा शनिवारी (दि. १९) आढावा घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. ते पुढे म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीसाठी राज्य शासनामार्फत ६० टक्के व आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत ४० टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे मुख्य सचिवांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पाच्या कामकाजाला सुरुवात करावी. तसेच भविष्यातील पुढील प्रकल्पांना अनुकरणीय ठरावी अशी या इमारतीची उत्कृष्ट रचना करण्यात यावी. इमारतीचा आराखडा तयार करण्यासाठी लवकरात लवकर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्याच्या सूचना भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिकेचे उपायुक्त मनोज घोडे-पाटील, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे समन्वयक डॉ. संदीप गुंडरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.एन.राजभोज, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी एन.व्ही.कळसकर, विधी अधिकारी संदीप कुलकर्णी उपस्थित होते.