पदवीधरच्या निवडणुकीसाठी इच्छुक सरसावले
By admin | Published: September 30, 2015 11:56 PM2015-09-30T23:56:41+5:302015-09-30T23:57:32+5:30
नोंदणीवर भर : भाजपाकडून अनेक संस्थाचालक इच्छुक
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषित होताच इच्छुकांना घुमारे फुटले आहेत. मतदार नोंदणीतच खऱ्या अर्थाने विजय असल्याने पक्षीय इच्छुकांबरोबरच शिक्षण संस्था ताब्यात असलेले अनेक इच्छुक पुढे आले आहेत. पुढील वर्षी निवडणूक होणार आहे.
नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघ अनेक वर्षे भाजपाच्या ताब्यात होता. आधी ना. स. फरांदे आणि त्यांच्यानंतर प्रतापदादा सोनवणे यांनी या मतदारसंघावर पकड कायम ठेवली. परंतु सोनवणे यांना लोकसभेच्या धुळे मतदारसंघातून विजय मिळाल्यानंतर मात्र पदवीधर मतदार संघावरील पकड ढिली झाली. सोनवणे यांनी राजीनाना दिल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने आगंतुक प्रसाद हिरे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी कॉँग्रेसच्या सुधीर तांबे यांनी त्यांचा पराभव केला. तांबे यांना अवघ्या नऊ महिन्यांसाठी ही संधी मिळाली. त्यामुळे पुन्हा झालेल्या निवडणुकीत हाच एक कळीचा मुद्दा ठरला. त्यानंतर कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी एकत्र झाली. त्यामुळे पक्षात अगोदरपासून सक्रिय आणि प्रबळ दावेदार असलेल्या प्रा. सुहास फरांदे यांना यश मिळू शकले नाही. आता पुन्हा निवडणूक होत असताना फरांदे हे इच्छुक नाहीत. तर तांबे यांच्या रूपाने शिक्षण संस्था ताब्यात असणाऱ्यांना पदवीधर नोंदणी विभागात करता येत असल्याचे स्पष्ट झाल्याने आता अनेक संस्थाचालकच रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत.
कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली किंवा नाही तरी विद्यमान आमदार म्हणून तांबे यांची दावेदारी प्रबळ आहे. तर विरोधक म्हणून भाजपाकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे. सध्या भाजपाकडून नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभापती अॅड. नितीन ठाकरे इच्छुक आहेत. त्यांच्यापाठोपाठ नामकोचे माजी संचालक हेमंत धात्रक तसेच प्रशांत पाटील इच्छुक असल्याचे वृत्त आहे. याशिवाय अहमदनगरमधून अभय आगरकर तर धुळे जिल्ह्यातून संभाजी पगारे हे इच्छुक आहेत.
खरी निवडणूक ही नाशिक आणि नगरच्या प्रभावावर आहे. त्यामुळे आता पक्षीयस्तरावर इच्छुकांची व्यूहरचना सुरू झाली आहे. अर्थात त्यासाठी पदवीधरांची सभासद नोंदणी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून त्यासाठी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)