व्यवस्था असूनही ‘अनारोग्य’ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:28 AM2018-09-29T00:28:01+5:302018-09-29T00:28:18+5:30
नाशिक : सध्या साथीच्या रोगांनी शहरवासीयांना चौफेर घेरले असून, व्हायरल फिवरबरोबरच स्वाइन फ्लूू, डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया यांसारख्या साथीच्या व संसर्गजन्य आजारांनी हजारो रुग्ण बाधित झाले आहेत. स्वाइन फ्लूमुळे बळी जाणाऱ्यांच्या संख्येने राज्य सरकारही चिंताग्रस्त झाल्याने त्यांनी खासगी तसेच शासकीय रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्यात हयगय न करण्याचे बजावले आहे. स्वाइन फ्लू असो की साथीचे अथवा अन्य आजार असो, त्याचा संबंध आरोग्य व्यवस्थेशी जोडला जात असल्यामुळे नाशिक शहरात महापालिकेच्या वतीने व ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य व्यवस्थेच्या वतीने रुग्णांच्या ज्या काही सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या सेवेचा लाभ कितपत रुग्णांना मिळतो, रुग्णालयांची सद्यस्थिती काय आहे, वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांकडून रुग्णांना दिली जाणारी वागणूक, रुग्णालयातील औषधसाठा, केसपेपरची व्यवस्था, विविध प्रकारच्या तपासण्यांची सोय आदी बाबी तपासण्यासाठी ‘लोकमत’ चमूने शुक्रवारी सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत शहरातील विविध भागातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. त्यामध्ये काही रुग्णालयांमध्ये खरोखरच ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ मानून आपले कर्तव्य निभावताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दिसले. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तीन महिन्यांपूर्वी औषधांची कमतरता आता दूर झाल्याचेही या पाहणीत जाणवून आले. काही ठिकाणी रुग्णांच्या अगोदर वैद्यकीय अधिकारी हजर तर काही ठिकाणी रुग्णांना वैद्यकीय अधिकाºयांची वाट पाहत तिष्ठत राहावे लागले. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. मोठ्या रुग्णांलयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवली तर काही ठिकाणी अन्य तपासण्यांची सोय नसल्यामुळे रुग्णांची ससेहोलपट झाल्याचे चित्रही यावेळी दिसले. आरोग्याच्या सुविधा असूनही शहरवासीयांचे अनारोग्य बिघडलेले आढळून आले.
स्वामी समर्थ रुग्णालयात दररोज सहाशे रुग्णांची तपासणी
दि.२८ सप्टेंबर २०१८, वेळ : सकाळी नऊ वा.
स्थळ : श्री स्वामी समर्थ रुग्णालय (मोरवाडी)
सकाळपासून रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसून आली. बाह्य रुग्ण तपासणीच्या कामात रुग्णांना केसपेपर दिल्यानंतर रुग्ण डॉक्टरांकडे तपासणीसाठी जात होते. यावेळी रुग्णांच्या रांगा लागल्या असताना प्रमुख डॉक्टर मात्र काही मिनिटे उशिराने हजर झाल्याचे दिसून आले.
रुग्णालयात प्रामुख्याने सर्दी, ताप, खोकला याबरोबरच स्वाइन फ्लूचे तपासणी केंद्र असल्याने अशा रुग्णांचीही तपासणी करून तत्काळ औषधे दिली जात होती.
रुग्णाला स्वाइन फ्लूची लक्षणे दिसली तर त्यास तत्काळ टॅमी फ्लूची लस देऊन रुग्णाला घराबाहेर जाऊ नये असे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात होता. महिनाभरात सुमारे ८६ स्वाइन फ्लू व डेंग्यू सदृश आजाराच्या रुग्णांना लस देण्यात आली असल्याचे नोंदणीत दिसून आले.
दररोज सहाशेहून अधिक रुग्णांची तपासणी
श्री स्वामी समर्थ रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणीत सिडकोसह पाथर्डी, अंबड, खुटवडनगर यांसह परिसरातील सुमारे ६०० हून अधिक रुग्णांची दररोज तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जातात. १ सप्टेंबरपासून ७४६४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.