त्रिमूर्ती चौकात सिग्नल असूनही कोंडी
By Admin | Published: November 4, 2015 11:12 PM2015-11-04T23:12:29+5:302015-11-04T23:13:18+5:30
थांब्याचा अडथळा : अपघाताला आमंत्रण; वाहतूक कोंडीतून अद्यापही नाही मुक्तता
सिडको : येथील त्रिमूर्ती चौकात वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली असली तरी, या सिग्नलला लागूनच रस्त्यावर शहर बस, तसेच रिक्षाचा थांबा असल्यामुळे वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची मुक्तता झालेली नाही. उलट सिग्नल सुटल्यावर भर चौकातच वाहनांच्या रांगा लागू लागल्या आहेत.
त्रिमूर्ती सिग्नलवर पवननगर तसेच कामटवाडे हे दोन्ही रस्ते येऊन मिळतात, नेहमी वर्दळीच्या असलेल्या या रस्त्यांवर वाहनांची संख्या अधिक असते, ज्यावेळी सिडकोकडून नाशिककडे जाणारा सिग्नल सुटतो, नेमके त्याचवेळी या सिग्नलवर देवी मंदिरासमोर शहर बस, तसेच रिक्षाचालक प्रवाशांना घेण्यासाठी थांबतात. परिणामी सिग्नल सुटूनही उपयोग होत नाही. पाठीमागून येणारी वाहने भर चौकात आल्यावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या चौकातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वा वाहतूक सुरुळीत करण्यासाठी बसवलेल्या सिग्नलचा काहीच उपयोग होत नाही. एका बाजूच्या सिग्नलवरील वाहतूक खंडित झाली तर त्याचा परिणाम दुसऱ्या बाजूच्या सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांवर होत असतो. तसाच प्रकार उंटवाडीकडून पवननगरकडे जाताना त्रिमूर्ती चौकात होत असतो. पेठेनगर शाळेच्या पुढे भाजीपाला व अन्य व्यावसायिकांचे गाळे असून, त्यांच्याही पुढे येऊन हातगाड्या लावल्या जातात व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडून या हातगाड्यांच्या पुढे रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे सिग्नल ओलांडून पुढे जाऊ पाहणाऱ्या वाहनांना या रस्त्यावर जागाच नसल्याने अतिशय मंद गतीने वाहने पुढे सरकतात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळेच सिग्नल असूनही केवळ जवळच असलेल्या बस थांब्यामुळे आणि रिक्षा थांब्याच्या अतिक्रमणामुळे सिग्नल असूनही वाहतूक नियंत्रण होवू शकत नसल्याची परिस्थिती आहे.