नाशिक मध्ये पर्यावरण स्नेही विसर्जन; 17 हजाराहून अधिक मूर्तींचे महापालिकेने स्वीकारले दान
By संजय पाठक | Published: September 9, 2022 04:14 PM2022-09-09T16:14:23+5:302022-09-09T16:15:08+5:30
नाशिकमध्ये पर्यावरण स्नेही विसर्जन होत असून 17 हजाराहून अधिक मूर्तींचे महापालिकेने दान स्वीकारले आहे.
नाशिक: गोदावरी आणि अन्य नद्यांमध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने नदीपात्रात मूर्ती विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे त्याऐवजी विसर्जित मूर्तींचे दान स्वीकारले जात आहे. आज दुपारपर्यंत नाशिक शहराच्या विविध भागातून 17 हजार 325 विसर्जित मूर्तीचे दान संकलित करण्यात आले आहे. सर्वात जास्त आठ हजारहून अधिक मूर्ती पंचवटी विभागातून प्राप्त झाल्या आहेत. नाशिक शहरात गोदावरीचे प्रदूषण हा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे गेल्या सुमारे २५ वर्षांपासून नदी प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य आणि गणेश मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन करण्यास मनाई केली जाते.
पर्यावरण स्नेही विसर्जन
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती नदी पात्रात विसर्जित करण्यास मनाई असली तरी अलीकडे शाडू मातीच्या मूर्तीही नदी पात्रात विसर्जित करू दिल्या जात नाहीत या मूर्तींवर रासायनिक रंग असल्यामुळे नदी प्रदूषणात वाढ होऊ शकते असे महापालिकेचे म्हणणे आहे. यंदाही सुमारे वीस ते पंचवीस सेवाभावी संस्थेच्या मदतीने महापालिका विविध भागांमध्ये विसर्जित मूर्तींचे दान स्वीकारत आहे विसर्जन स्थळांच्या ठिकाणी मंडप उभारण्यात आले असून या ठिकाणी मूर्ती विसर्जित करायचे असल्यास कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत. याशिवाय मोठ्या सोसायट्यांसाठी टॅन्कस ऑन व्हील ही संकल्पना राबवण्यात आली आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या परिसरातच नागरिकांना गणेश मूर्तींचे विसर्जन करता येत आहे. आत्तापर्यंत नाशिक शहरात 17 हजार 325 मूर्तीचे दान मिळाले आहे. सायंकाळी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे असे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.