सत्तापदानंतरही राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रभावहीन

By admin | Published: January 3, 2017 11:41 PM2017-01-03T23:41:57+5:302017-01-03T23:42:18+5:30

नेतृत्वाविना पोरकेपण : पाच वर्षांत कामगिरी यथातथाच; आत्मविश्वासाचाही अभाव

Despite the power, the Nationalist Congress is ineffective | सत्तापदानंतरही राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रभावहीन

सत्तापदानंतरही राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रभावहीन

Next

नाशिक : महापालिकेत मनसेसोबत महाआघाडीत सामील होत राष्ट्रवादी कॉँग्रेसने गेल्या अडीच वर्षांत स्थायी समितीचे सभापती आणि विरोधी पक्षनेतापद प्राप्त केले, परंतु सत्तापदानंतरही राष्ट्रवादीची कामगिरी प्रभावहीन राहिली. जिल्ह्यातील प्रभावशाली नेते छगन भुजबळ यांच्या तुरुंगवासामुळे नेतृत्वाविना पोरक्या बनलेल्या राष्ट्रवादीची अवस्था इतकी दयनीय झाली आहे, की आगामी महापालिका निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याइतपतही बळ पक्षाच्या भुजात उरलेले नाही.
सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस सर्वाधिक जागा प्राप्त करेल, असा कयास होता. परंतु, राज ठाकरे यांच्या लाटेत राष्ट्रवादीच्या खात्यात केवळ २० जागा पडल्या. पहिल्या अडीच वर्षांत मनसेने भाजपासोबत घरोबा केल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसने विरोधी पक्षात राहणे पसंत केले. राष्ट्रवादीच्या गटनेतापदाची धुरा विनायक खैरे यांच्यावर सोपविण्यात आली, परंतु खैरे यांचा प्रभाव पडला नाही आणि अडीच वर्षांत विरोधी पक्षाची भूमिकाही नीटपणे निभावली गेली नाही. याऊलट खैरे यांच्याच विरोधात पक्षांतर्गतच सूर उमटत राहिले. महापालिकेच्या सत्तेच्या खेळात उत्तरार्धात मनसेने पुन्हा सत्ता राखण्यासाठी धडपड चालविली असतानाच राष्ट्रवादीच्या पुढाकाराने कॉँग्रेस आणि अपक्षांना सोबत घेऊन महाआघाडीची मोट बांधली गेली आणि पहिली अडीच वर्षे विरोधी पक्षात असलेली राष्ट्रवादीनंतर सत्तेत जाऊन बसली. मनसेला पाठिंबा देण्याच्या बदल्यात राष्ट्रवादीला काही सत्तापदे बहाल करण्याच्या तडजोडी झाल्या आणि शिवाजी चुंभळे यांच्या रूपाने राष्ट्रवादीला महत्त्वाचे स्थायी समितीपद प्राप्त झाले. राष्ट्रवादीला खूश करण्यासाठी मग सत्तेत असूनही विरोधी पक्षनेतापदही देण्याचा पराक्रम सत्ताधारी मनसेने करून दाखविला. त्यामुळे शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांच्याकडून अचानक विरोधी पक्षनेतापद काढून घेत प्रा. कविता कर्डक यांच्याकडे देण्यात आले. परंतु, सत्तेतील सहभागामुळे विरोधी पक्षनेतापदी असूनही कर्डक यांना विरोधी भूमिका घेणे अडचणीचे बसले. राष्ट्रवादीची कामगिरी गेल्या पाच वर्षांत यथातथाच राहिली. जेथे सोयीचे असेल तेथेच विरोधाची धार तीव्र करण्यात आली, तर इतरवेळी भलामण करण्यातच पक्षाच्या सदस्यांनी वेळ घालविला.

Web Title: Despite the power, the Nationalist Congress is ineffective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.