तणावात असूनही तरुणाई अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:55 AM2018-05-28T00:55:56+5:302018-05-28T00:55:56+5:30
तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला तरुण प्रचंड तणावात आहे. परंतु त्याला हे माहीतच नाही की, तो तणावाला बळी पडला आहे. तंत्रज्ञान हे मानसिक आजाराला निमंत्रण देणारे ठरत असल्याने आपण त्याचा कसा व किती वापर करावा हे ठरविणाची गरज आहे, असे मत अभिनेता चिन्मय उद्गीरकर याने व्यक्त केले.
नाशिक : तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला तरुण प्रचंड तणावात आहे. परंतु त्याला हे माहीतच नाही की, तो तणावाला बळी पडला आहे. तंत्रज्ञान हे मानसिक आजाराला निमंत्रण देणारे ठरत असल्याने आपण त्याचा कसा व किती वापर करावा हे ठरविणाची गरज आहे, असे मत अभिनेता चिन्मय उद्गीरकर याने व्यक्त केले. इंडियन सायकियॅस्ट्रीक सोसायटी आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त ‘कट्टा’ उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अभिनेता चिन्मय उद्गीरकर याची प्रकट मुलाखत घेण्यात आली. चिन्मयने तणाव आणि त्याचा अभिनयातील प्रवास यावर बोलताना तरुणाईला केंद्रस्थानी ठेवत विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. चिन्मयने सांगितले की, तणावाला बळी पडण्यास तंत्रज्ञान जबाबदार असून, याविषयी तरुणाई अनभिज्ञ आहे. यावेळी अभिनय क्षेत्रात कशापद्धतीने तणावाचा सामना करावा लागतो याबद्दलही त्याने सांगितले. नाशिकमधून जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा त्याठिकाणी उत्कृष्ट अभिनय असून चालत नाही, याची जाणीव झाली. कारण येथे केवळ मनोरंजनााच विचार केला जातो. बऱ्याचदा मनाविरुद्ध असलेल्या गोष्टींचा फारसा विचार न करता त्यात वाहून जावे लागते. रिअॅलिटी शोबद्दलची रिअॅलिटी तर काही औरच आहे. याठिकाणी तुमच्या भावना विकल्या जातात. गुणवत्तेपेक्षा मसाला मिळावा यासाठी कुठल्याही स्तराला जाण्याची निर्मात्यांची मानसिकता असते, असेही चिन्मयने सांगितले. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ताणतणावापासून दूर राहून आयुष्य कसे जगावे याची माहिती सांगणारे एक पथनाट्य सादर करण्यात आले. रेवन जोशी, सारिका आरोटे, मानसी अष्टपुत्रे, करण राणे, अमोल ठाकरे, जागृती फेगडे यांनी हे पथनाट्य सादर केले, तर या पथनाट्याचे दिग्दर्शन आणि लेखन आरुषी बोरकर यांनी केले होते. स्किझोफ्रेनिया नेमका काय आजार आहे, त्याची लक्षणे काय आहेत, त्यावर उपचार कशापद्धतीने केले जातात याविषयी माहिती देणाºया तज्ज्ञ डॉक्टरांची एक क्लिपही यावेळी दाखविण्यात आली. डॉ. हितेश दौंड आणि डॉ. अनुपम भारती यांनी मुलाखत घेतली.
दीपिकाही तणावात
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणही तणावाला बळी पडली. तिने जाहीरपणे याबाबतची कबुली दिल्यानेच यास जणू काही ग्लोबल स्वरूप प्राप्त झाले. मात्र तिने याबाबतची कबुली देणे ही खूप मोठी बाब आहे. त्यामुळे तणावाला कोणीही बळी पडू शकतो, असेही चिन्मयने सांगितले.