निलंबित होऊनही कार्यालयातच ठाण पंचायत समितीतील प्रकार, उपसभापतींची तक्रार
By Admin | Published: February 7, 2015 01:07 AM2015-02-07T01:07:36+5:302015-02-07T01:31:28+5:30
निलंबित होऊनही कार्यालयातच ठाण पंचायत समितीतील प्रकार, उपसभापतींची तक्रार
नाशिक : पंचायत समितीत कार्यरत असताना शेतकऱ्यांकडून बैलजोडीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारीवरून निलंबित करण्यात आलेले पंचायत समितीतील कृषी अधिकारी नवलसिंग पवार निलंबित होऊनही नाशिक तालुका पंचायत समितीतच दररोज येऊन कामकाज करीत असल्याची तक्रार उपसभापती अनिल ढिकले यांनी केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारीवरून तसेच गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांनी नवलसिंग पवार यांनी याआधी असेच प्रकार केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव सुखदेव बनकर यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार सुखदेव बनकर यांनी कृषी अधिकारी नवलसिंग पवार यांना महिनाभरापूर्वी तडकाफडकी निलंबित केले होते. त्यानंतर नवलसिंग पवार यांनी सुखदेव बनकर यांची भेट घेऊन आपण पैसे मागीतले नव्हते मात्र चुकीचे काम करण्यासाठी आपल्यावर दबाव आला होता. तो आपण नाकारल्यानेच आपल्या अंगावर पैसे फेकण्यात आल्याचे तसेच शेतकऱ्यांच्याच कामासाठी प्रसंगी शे-दोनशे रुपये त्यांच्या राजीखुशीनेच घेत असल्याची कबुलीही देऊन टाकली होती. निलंबनानंतर नवलसिंग पवार यांना निफाड पंचायत समिती कार्यालय मुख्यालय दिलेले असताना प्रत्यक्षात नवलसिंग पवार हे नाशिक तालुका पंचायत समितीतच त्यांच्या टेबलावर येऊन दररोज कामकाज करीत असल्याचा आरोप उपसभापती अनिल ढिकले यांनी केला असून, तशी तक्रार गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात रवींद्रसिंह परदेशी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)