मिठाई दुकानांच्या भट्ट्यांमुळे वाढला धोका

By Admin | Published: November 21, 2015 11:46 PM2015-11-21T23:46:07+5:302015-11-21T23:46:39+5:30

रहिवासी भयभीत : सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार

Dessert stores have increased risk of furnaces | मिठाई दुकानांच्या भट्ट्यांमुळे वाढला धोका

मिठाई दुकानांच्या भट्ट्यांमुळे वाढला धोका

googlenewsNext

 इंदिरानगर :परिसरात नागरी वसाहतींमध्ये दिवसेंदिवस मिठाईची दुकाने वाढत असून, या दुकानांमध्ये असलेल्या भट्ट्या आणि गॅस सिलिंडर रहिवासी क्षेत्राला धोकादायक ठरत आहे. शहरात जलाराम आणि इंदिरानगर येथे राजसारथी सोसायटीत यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांनंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. परिणामी सुरक्षा नियम पायदळी तुडवले जात असल्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.
इंदिरानगर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढल्या आहेत. इंदिरानगरसह विनयनगर, दीपालीनगर, समर्थनगर, साईनाथनगर, चेतनानगर, पांडवनगरी, राणेनगर, राजीवनगर अशा सर्वच भागात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था वाढल्या आहेत. त्यातील बहुतांशी इमारती या रहिवासी आणि व्यापारी स्वरूपाच्या आहेत. म्हणजेच इमारतींमध्येच तळमजल्यावर दुकाने काढण्यात आली आहेत. इमारतीत किराणा, इस्तरीचे दुकान, गॅरेज आणि अन्य इतर अनेक व्यवसाय वाढत आहेत. परंतु त्यातल्या त्यात सध्या चलनी ठरलेला मिठाईचा व्यवसाय फोफावत आहे. इमारतींमध्ये असलेल्या मिठाई विक्रीच्याच ठिकाणी मिठाई तयार करणारे अनेक व्यावसायिक आहेत. दुकानांतून ताजी मिठाई देण्यासाठी थेट विक्रीच्याच ठिकाणी ही व्यवस्था असल्याने त्याचा कदाचित दुकानदारांच्या व्यवसायाला लाभ होत असेल; परंतु अशी मिठाईची दुकाने अडचणीचीदेखील ठरत आहेत. मिठाई तयार करण्यासाठी व्यावसायिक भट्ट्या वापरल्या जातात. तसेच कमर्शियल सिलिंडर वापरले जातात. तेथेच तळण आणि अन्य प्रक्रिया केली जात असल्याने अनेकदा गरम वाफा आणि धूर निघत असतो. परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होतोच. परंतु दुकानाची विजेची व्यवस्था चांगली नसेल तर अंतर्गत केबल्स वितळून शॉट सर्किट होऊ शकतात किंवा तापलेल्या भट्टीमुळे सिलिंडरचा स्फोट होऊ शकतो. नाशिक शहरात यापूर्वी दुकानांना अशाप्रकारे शॉटसर्किटमुळे आग लागून दुर्घटना घडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शहरातील कॉलेजरोडवर जलाराम फरसाण मार्ट येथे अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर तेथेच विनापरवाना मिठाई तयार केली जात असल्याचा प्रकार महापालिकेच्या अग्निशमन दलाला आढळला होता. इंदिरानगरातील राजसारथी येथेही एका बेकरीच्या दुकानास भट्टीमुळेच आग लागली होती. त्यावेळी अग्निशमन दलाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली होती. परंतु हा प्रकार असाच सुरू राहिल्याने आता प्रशासन दुर्घटनेची वाट बघत आहे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: Dessert stores have increased risk of furnaces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.