गोदावरीच्या पात्रात आढळले बेवारस नवजात शिशू; बाळाच्या मनगटात वॉर्डाचा टॅग अन् त्यावर महिलेचे नाव
By अझहर शेख | Updated: July 4, 2024 13:39 IST2024-07-04T13:39:07+5:302024-07-04T13:39:21+5:30
जागरूक नागरिकाने ११२वर कॉल करून माहिती दिली असता तत्काळ पोलिस घटनास्थळी आले. बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तोपर्यंत बाळाचा मृत्यू झालेला होता.

गोदावरीच्या पात्रात आढळले बेवारस नवजात शिशू; बाळाच्या मनगटात वॉर्डाचा टॅग अन् त्यावर महिलेचे नाव
संदीप झिरवाळ
नाशिक : नाशिककरांचे पारंपरिक पूर पर्जन्यमापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीतील दुतोंड्या मारूतीजवळ बेवारसस्थितीत अज्ञातांनी नवजात शिशूला टाकून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. एक दिवाचे जन्मलेले पुरूष जातीचे बाळ याठिकाणी आढळून आल्याने खळबळ उडाली. जागरूक नागरिकाने ११२वर कॉल करून माहिती दिली असता तत्काळ पोलिस घटनास्थळी आले. बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तोपर्यंत बाळाचा मृत्यू झालेला होता.
बुधवारी (दि. ३) भरदिवसा अज्ञात व्यक्तीने पुरुष जातीचे नवजात शिशु गोदाघाटावर बेवारस पडलेले आहे, अशी माहिती पोलिसांना ११२ क्रमांकावर फोन करून माहिती दिली. नियंत्रण कक्षातून पंचवटी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत नवजात बाळाला घेत रूग्णालयात हलविले. तेथे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
महिला विवाहित असो किंवा अविवाहित तिला २४आठवड्यापर्यंतचा सुरक्षित व कायदेशीर गर्भपात करता येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांपुर्वीच स्पष्ट केले आहे. संसदेने गर्भपात सुधारणा विधेयक मंजूरही केले आहे. तरीदेखील नवजात बाळांना बेवारसपणे उघड्यावर टाकून मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचे प्रकार शहर व परिसरात घडत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. मागील काही महिन्यांपुर्वी बोधलेनगरजवळ कचराकुंडीत तर पाथर्डी गावाजवळच्या सार्वजनिक शौचालयातसुद्धा अशाचप्रकारे नवजात शिशु मृतावस्थेत आढळून आले होते.