हॉटेलमध्ये चालणारा कुंटणखाना उद्ध्वस्त
By admin | Published: May 11, 2017 02:25 AM2017-05-11T02:25:03+5:302017-05-11T02:25:14+5:30
नाशिक : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील पंचवटी शिवारात असलेल्या हॉटेल करवलीमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांनी बंद पाडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील पंचवटी शिवारात असलेल्या हॉटेल करवलीमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांनी बंद पाडला आहे. पोलिसांनी हॉटेल मालकासह व्यवस्थापक व एका बंगाली तरुणीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी पंचवटी पोलीस पथकाच्या साहाय्याने संशयास्पद हॉटेलवर धाड टाकली. यावेळी विनापरवाना विदेशी मद्यविक्रीसह वेश्याव्यवसायदेखील हॉटेलमध्ये सर्रास सुरू असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी यावेळी येथून एका २३ वर्षीय बंगाली तरुणीला ताब्यात घेतले आहे. याबरोबरच दहा हजार रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या असून, हॉटेलमालक प्रवीण मधुकर खर्डे (४३,रा. स्वामी नारायण चौक) व्यवस्थापक नंदकिशोर नारायण पाटील (४५, रा. पंचवटी), कामगार प्रदीपकुमार शिवप्रसाद वर्मा (२९ रा. मध्य प्रदेश) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील हॉटेलमध्ये विनापरवाना चालणारी मद्यविक्री आणि वेश्याव्यवसाय पुन्हा एकदा या कारवाईमुळे चर्चेत आला आहे. महामार्गालगत असलेल्या हॉटेल संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या असून, पोलिसांनी याकडे लक्ष केंद्रित केले आहे. बेकायदेशीरपणे केली जाणारी व्यवसायाविरोधी कारवाई सुरूच राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.