भगूर शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत बांधकामे उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:35 PM2020-02-01T23:35:59+5:302020-02-02T00:08:42+5:30
शहरात गेल्या ३० वर्षांपासून नगरपालिकेच्या जागेवर ठिकठिकाणी करण्यात आलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांच्या विरोधात शनिवारी भगूर नगरपालिका प्रशासनाने धडक मोहीम राबवून जेसीबीच्या सहाय्याने पक्की बांधकामे उद्ध्वस्त केली. नगरपालिकेच्या या धाडसी पावलाचे अनेकांनी स्वागत केले.
भगूर : शहरात गेल्या ३० वर्षांपासून नगरपालिकेच्या जागेवर ठिकठिकाणी करण्यात आलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांच्या विरोधात शनिवारी भगूर नगरपालिका प्रशासनाने धडक मोहीम राबवून जेसीबीच्या सहाय्याने पक्की बांधकामे उद्ध्वस्त केली. नगरपालिकेच्या या धाडसी पावलाचे अनेकांनी स्वागत केले.
भगूर शहरात विनापरवाना नगरपालिकेच्या जागेवर टपऱ्या, कच्च्या पत्र्याची घरे, पायºया, सीमेंटचे ओटे उभारून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते. शहरात जागोजागी अतिक्रमणाचे पेव फुटल्याने त्यातून रस्ता वाहतुकीला अडथळाही निर्माण झाला होता. यासंदर्भात वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. अखेर नगरपालिकेने बेकायदेशीर बांधकामांच्या विरोधात मोहीम राबविण्याचे ठरवून तीन दिवसांपासून गावात दवंडी पिटली व बेकायदेशीर बांधकाम, नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण केलेल्यांना स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले. त्यास फारसा प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारी सकाळी ११ वाजता पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, बांधकाम अभियंता रमेश कांगणे, पाणीपुरवठा प्रमुख रवींद्र संसारे, स्वच्छता निरीक्षक सागर गायकवाड, मालमत्ता अधिकारी मोहन गायकवाड, अनिल बिजलपुरे, रमेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या साह्याने प्रथम शिवसेना नगरसेविका कविता यादव यांच्या बंगल्यासमोरील ओटा व पाºया काढल्या. त्यानंतर माजी नगरसेवक अजय लोट यांचे कार्यालय, कातकाडे, शेख, पठाण यांच्या घराच्या पायºया तर राममंदिररोड येथील योगीता घोलप, चौधरी यांची लोखंडी टपरी जप्त केली. भाऊसाहेब ससाणे यांचे अतिक्रमित दुकान, द्रौपदाबाई मोरे यांच्या गोठ्यासह रस्त्यावरील पाण्याचे ड्रम, टपºया आदी वस्तू जप्त केल्या. राम मंदिररोड, दत्त मंदिर विभाग, मोठा गणपती परिसर, चिंचबन, आठवडे बाजार, पंचशीलनगर आदी भागात ही मोहीम राबविण्यात आली. नगरपालिकेच्या या मोहिमेमुळे नाराज झालेल्या नागरिकांनी अतिक्रमण पथकातील अधिकारी, कर्मचाºयाशी हुज्जत घालून गोंधळ घातला, दरम्यान, शहरात अजूनही काही ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले असून, नागरिकांनी ते काढून घ्यावे अन्यथा धडक मोहिमेत ते काढून टाकण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांनी दिला आहे. तर नगरपालिकेने अतिक्रमण काढण्यापूर्वी कोणतीही नोटीस दिलेली नाही, अशी तक्रार करून या मोहिमेत गरीब, श्रीमंत असा भेदभाव केला गेल्याचा आरोपही काहींनी केला.
तीस वर्षांपूर्वीची आठवण
भगूर शहरात साधारणत: ३० वर्षांपूर्वी भगूरचे तत्कालीन नगराध्यक्ष अॅड. गोरखनाथ बलकवडे यांनी अतिक्रमण मोहीम राबविली होती. त्यात अतिक्रमित अनेक पक्क्या घरांच्या भिंतीही पाडण्यात आल्या, तर मारवाडी गल्लीतील अतिक्रमण काढून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. त्यावेळीदेखील अतिक्रमणधारकांनी नगरपालिकेवर संताप व्यक्त केला होता. अतिक्रमण मोहीम राबविल्यामुळेच त्यानंतरच्या निवडणुकीत बलकवडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. शनिवारच्या मोहिमेनंतर शहरात पुन्हा एकदा तीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.