घाटावर किती पाणी असेल याचा सविस्तर अभ्यास
By admin | Published: May 13, 2015 01:23 AM2015-05-13T01:23:45+5:302015-05-13T01:25:39+5:30
घाटावर किती पाणी असेल याचा सविस्तर अभ्यास
नाशिक : गेल्या महिन्यात गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या एक हजार क्युसेस पाण्याच्या विसर्गातच कुंभमेळ्यासाठी विस्तारीकरण करण्यात आलेला घाट बुडाल्याने प्रत्यक्षात पावसाळ्यात गंगापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी व गोदावरीला येऊन मिळणाऱ्या अन्य नद्या, नाल्यांचा विसर्ग पाहता, घाटावर किती पाणी असेल याचा सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिल्या. घाट विकासाच्या संथ गतीवर नाराजी व्यक्त करतानाच या घाटाला येऊन मिळणाऱ्या रस्त्यांबाबतही पाटबंधारे खात्याच्या चालढकलाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. भाविकांची रामकुंडावर स्नानासाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी घाट विकसित करण्यात येत असून, कुंभमेळ्याच्या काळात गंगापूर धरणातून सुटणारे पाणी व पावसाळ्याच्या पाण्यात या घाटाचा कितपत उपयोग होऊ शकतो याचा अभ्यास करण्यासाठी सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च सेंटर या संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. या संस्थेने मंगळवारच्या कुंभमेळा आढावा बैठकीत आपले सादरीकरण केले. मात्र त्यांनी केलेले सादरीकरण व प्रत्यक्षात पावसाळ्यात घाटावर असणारे पाणी याचा ताळमेळ बसण्याबाबत शंका उपस्थित करण्यात येऊन त्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. घाटाच्या विस्तारीकरणाबरोबरच या घाटावर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ये-जा करण्यासाठी अजूनही रस्त्यांची कामे सुरू करण्यात आलेली नाहीत. पाटबंधारे खात्याच्या संथगतीमुळेच काम रखडल्याची भावना व्यक्त करण्यात आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक बैठकीत कामे पूर्ण करण्याबाबत निव्वळ आश्वासने दिली जातात, परंतु पूर्तता होत नसल्याने आता ३१ मेपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात यावीत अशा सूचनाही देण्यात आल्या. रेल्वेने पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करावी यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. कुंभमेळ्याच्या काळात रेल्वे जागा आरक्षण बंद करून त्याऐवजी अधिकचे डबे कसे जोडता येतील याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साधुग्राम परिसरात खाद्यपदार्थ व भाजीपाला स्टॉलसाठी व्यवस्था करावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आली. या बैठकीस महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त एस. जगनाथन, पोलीस अधीक्षक संजय मोहिते आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)