नाशिक-दिल्ली विमानसेवेसाठी चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:02 AM2018-08-22T01:02:50+5:302018-08-22T01:04:20+5:30
नाशिकहून सुरू असलेल्या प्रवासी विमानसेवेस व कार्गो सुविधेस चांगला प्रतिसाद मिळत असून, सध्या आठवड्यातून तीन दिवस ही सेवा दिली जात आहे.
सातपूर : नाशिकहून सुरू असलेल्या प्रवासी विमानसेवेस व कार्गो सुविधेस चांगला प्रतिसाद मिळत असून, सध्या आठवड्यातून तीन दिवस ही सेवा दिली जात आहे. मात्र उद्योजकांच्या मागणीचा विचार करून लवकरच दररोज विमानसेवा देण्यासाठी चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती जेट एअरवेजचे उपाध्यक्ष गिलबर्ट जॉर्ज यांनी निमामध्ये आयोजित बैठकीत दिली. निमात आयोजित जेट एअरवेजचे अधिकारी आणि विविध औद्योगिक संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. गिलबर्ट यांनी पुढे सांगितले की, दररोज देण्यात येणाऱ्या सेवेसाठी लागणारी आर्थिक बाजू, वेळापत्रकातील संभाव्य बदल याचा अभ्यास केला जात आहे. यावेळी इएसडीएसचे संस्थापक पीयूष सोमाणी यांनी नाशिकच्या क्षमता सिद्ध करणाºया बाबींचे सादरीकरण केले. व्यासपीठावर विमान कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक (गोवा व महाराष्ट्र) याजदी मार्कर, व्यवसाय व्यवस्थापक किन्नेर शाह, स्टेशन मॅनेजर अशोक अजोगुमलाई, खासदार हेमंत गोडसे, मनीष रावळ, तुषार चव्हाण, कैलास आहेर, शशिकांत जाधव, जीतूभाई ठक्कर आदी उपस्थित होते.