निकम खुनातील संशयितास कोठडी
By admin | Published: May 21, 2017 01:52 AM2017-05-21T01:52:46+5:302017-05-21T01:52:55+5:30
पंचवटी : पंचवटीतील किरण निकमच्या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या गणेश उघडे या संशयितास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी़ एस़ आपटे यांनी पोलीस कोठडी सुनावली़
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : पंचवटीतील किरण राहुल निकम या युवकाच्या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या गणेश उघडे या संशयितास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी़ एस़ आपटे यांनी शनिवार (दि़२०) ते मंगळवार (दि़२३) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ या खुनातील उर्वरित तीन संशयित हे फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़ पेठ रोडवरील शनिमंदिराच्या पाठीमागे असलेल्या नवनाथनगरमध्ये गुरुवारी रात्रीच्या सुमारास निकम याची धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली होती़
मयत किरण निकम याचा मावसभाऊ नितीन पगारे याने पूर्ववैमनस्यातून खून केल्याची फिर्याद पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे़ या फिर्यादीनुसार पेठ रोडवरील संतोष पगारे, संतोष उघडे, बंडू मुर्तडक, गणेश उघडे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यापैकी गणेश उघडे यास पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित मारेकरी फरार आहेत़ या संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़ दरम्यान, निकम याची हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी यातील मारेकऱ्यांच्या अटकेनंतर त्याचे कारण समोर येणार आहे़