तोतया ट्रॉफिक पोलीस आला अन् जीप घेऊन पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 05:53 PM2018-09-26T17:53:43+5:302018-09-26T17:54:45+5:30
सिन्नर : ‘माझी नव्यानेच सिन्नर येथे बदली झाली आहे. तुला साहेबांनी बोलावले. गाडीची चावी दे’, असे सांगून ट्रॉफिक पोलीस बनून आलेल्या एका ठकसेनाने चालकाकडून त्याची बोलेरो जीप पळवून नेल्याची घटना शनिवार (दि. २२) रोजी सिन्नरच्या डुबेरे नाक्यावर घडली.
सिन्नर : ‘माझी नव्यानेच सिन्नर येथे बदली झाली आहे. तुला साहेबांनी बोलावले. गाडीची चावी दे’, असे सांगून ट्रॉफिक पोलीस बनून आलेल्या एका ठकसेनाने चालकाकडून त्याची बोलेरो जीप पळवून नेल्याची घटना शनिवार (दि. २२) रोजी सिन्नरच्या डुबेरे नाक्यावर घडली. चक्क वाहतूक पोलीसाचा ड्रेस घालून वाहनचालकला फसवून त्याची जीप पळवून नेण्याच्या प्रकार दिवसाढवळ्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडल्याने पोलीस यंत्रणाही कोड्यात पडली आहे.
त्याचे झाले असे... इगतपुरी तालुक्यातील सोमज येथील दत्तू पांडुरंग कुंदे (४२) हे बहिणीला सोडण्यासाठी सिन्नर येथे बोलेरो जीप (क्र. एम. एच. १५ इ. पी. २५७३) घेऊन आले होते. बहिणीला सोडल्यानंतर ते परतीला निघाले होते. परत जात असतांना कुंदे यांना सिन्नर शहरातील मध्यवर्ती भागात गावठा येथे मारुती मंदिरासमोर मित्र भेटला. त्यामुळे कुंदे यांनी सिन्नर-घोटी रस्त्याच्या कडेला जीप उभी करुन मित्रासोबत गप्पा मारत थांबले. याचवेळी ट्रॉफिक पोलिसाचा वेष परिधान केलेली व्यक्ती दुचाकीहून येऊन त्यांच्याजवळ उभी राहिली. अंगात सफेद शर्ट, खाकी पॅँट, काळे बूट व अंगावर निळ्या रंगाचे जॅकेट घातलेल्या या व्यक्तीने माझी नव्याने येथे बदली झाली असल्याचे सांगितले. ‘तुला साहेबांनी बोलवले आहे. गाडीची चावी दे’ असे सांगून या तोतया वाहतूक पोलिसाने चालक कुंदे यांच्याकडून बोलेरो गाडीची चावी घेतली.
सोबत आणलेली स्प्लेंडर दुचाकी तेथेच ठेवून हे महाशय बोलरो जीप मध्ये ऐटीत बसले. स्वत:च्या हातात स्ट्रेअरिंग घेऊन या तोतया ट्रॉफिक पोलीसाने कुंदे याची जीप घोटी रस्त्याकडे सुसाट नेली. चालक कुंदे हे स्तब्ध होऊन पाहात राहिले. तोतया ट्रॉफिक पोलिसाची दुचाकी जागेवरच असल्याने त्यांना सुरुवातीला संशय आला नाही. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही बोलेरो जीप वळून पुन्हा माघारी न आल्याने कुंदे यांनी मालकासोबत संपर्क साधून आपबिती सांगितली. दोन दिवस परिसरात जीपचा शोध घेण्यात आला. त्यानंतर आपल्याला फसवून जीप पळवून नेल्याची तक्रार कुंदे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात दिली आहे.
याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सदर दुचाकी ताब्यात घेतली आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक रामदास धुमाळ, आर. बी. भागवत, दीपक शार्दूल अधिक तपास करीत आहेत.
चौकट- दुचाकीही चोरीची
सदर तोतया ट्रॉफिक पोलिसाने सोबत आणलेली दुचाकी घटनास्थळी मिळाली. पोलिसांनी या दुचाकीच्या मालकाचा शोध घेतल्यानंतर सदर दुचाकी नाशिक येथून चोरीला गेल्याचे समोर आले. त्यामुळे या तोतया पोलिसाने बोलेरो जीप पळवून नेण्यासाठी वापरलेली दुचाकीही चोरीचे समोर आले आहे.