डिजेवर बंदी; ढोलपथकांना वाढली संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:13 AM2017-09-02T01:13:48+5:302017-09-02T01:13:56+5:30
गणेशोत्सवात डिजेवर बंदी असल्यामुळे शहरासह परिसरांतील ढोलपथके व बॅन्जोवाल्यांना महत्त्व प्राप्त झाले असून, डिजेमुळे रसातळाला जात असलेले ढोल-ताशा पथक व बॅन्जोवाल्यांना व्यवसायाची नव्याने संधी प्राप्त झाली आहे.
नाशिक : गणेशोत्सवात डिजेवर बंदी असल्यामुळे शहरासह परिसरांतील ढोलपथके व बॅन्जोवाल्यांना महत्त्व प्राप्त झाले असून, डिजेमुळे रसातळाला जात असलेले ढोल-ताशा पथक व बॅन्जोवाल्यांना व्यवसायाची नव्याने संधी प्राप्त झाली आहे. गणेशोत्सवाचा सध्या उत्तरार्ध सुरू झाला असून, पाच दिवसांच्या व सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जनही मोठ्या उत्साहात पार पडले. यात प्रामुख्याने घरगुती गणपतींचाच समावेश होता. अनेक जणांनी आपल्या घरात विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचे ढोल-ताशांच्या तालात मिरवणूक काढून विसर्जन केले. या मिरवणुकींमध्ये लहान स्वरूपाच्या ढोल-ताशावाल्यांना बिदागी देऊन मिरवणुकीसाठी आमंत्रित केल्याचे दिसून आले. आता गणेशोत्सवाचा उत्तरार्ध सुरू असून, विसर्जनाचा दिवस जवळ येत असल्याने घरगुती गणपतीच्या मिरणुकीसाठी अशा ढोल-ताशांना मागणी वाढली आहे, तर मोठ्या सार्वजनिक मंडळांचे ढोलपथके निश्चित आहेत. परंतु, डिजेवर बंदी आल्याने बिदागीच्या रकमा वाढल्या आहेत. त्यामुळे ढोलपथकेही वेगवेगळ्या गणपती मंडळांचे आमंत्रण स्वीकारत आहे. थोडक्यात, ढोल पथकांनाही चांगल्या उत्पन्नाची संधी निर्माण झाल्याने तरु णाईने ढोल-ताशा पथकांची निर्मिती केली आहे. यंदा सर्वच ढोल-ताशा पथकांना मोठी मागणी आहे. दहाहून अधिक पथके एकट्या शहरात तयार झाली आहे.