त्र्यंबकेश्वर तालुक्यात लावणी कामांचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:50+5:302021-07-02T04:10:50+5:30
त्र्यंबकेश्वर/ देवगाव : पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात पावसाने दडी मारल्याने भातासह नागलींच्या रोपांची लावणी खोळंबली आहे. ...
त्र्यंबकेश्वर/ देवगाव : पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात पावसाने दडी मारल्याने भातासह नागलींच्या रोपांची लावणी खोळंबली आहे. रोपे तयार झाली असून, पावसाअभावी लावणी करता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून देवगाव परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला असून, भात लावणी करण्यासाठी आवणांत चिखल नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे.
दरवर्षीप्रमाणे जून महिन्याच्या उत्तरार्धात भात, नागली व वरईच्या लावणीला सुरुवात करण्याचा कल शेतकऱ्यांचा असतो. परंतु, पाऊस योग्यवेळी न पडल्याने नाईलाजाने शेतीची कामे थांबवावी लागली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने माघार घेतल्यामुळे देवगाव परिसरातील भात, वरई नागलीची रोपे उन्हांच्या तडाख्यामूळे करपू लागली आहेत. पावसाअभावी आवणांमध्ये चिखल होत नसल्याने आवणांच्या बांधावर मूठ बांधून ठेवण्याची वेळ बळीराज्यावर आली असून भात,वरई व नागलीची रोपे उन्हांमुळे पिवळी पडून संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावसह वावीहर्षे, टाकेदेवगाव, येल्याचीमेट, श्रीघाट, चंद्राचीमेट, आव्हाटे, डहाळेवाडी, टाकेहर्षे या दक्षिण भागात तुरळक पाऊस पडत असला तरी उन्हाच्या तडाख्यामुळे तो भातशेतीसाठी किंवा नागली वरईसाठी फायदेशीर नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी इंजन,विहीर, शेततळ्याच्या पाण्यावर भाताची लागवड करून पर्याय शोधला होता. परंतू, पाऊस पडत नसल्याने देवगाव परिसरातील शेतकरी आजही भात, नागली,वरईला पूरक असलेल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बळीराज्याला दमदार पावसाची प्रतीक्षा असताना आतापर्यंत १० टक्के सुद्धा पाऊस पडला नाही. मृग नक्षत्र संपले तरी या नक्षत्रात हवा असलेला पाऊस पडला नाही.
--------------------------------
खरिप हंगाम वाया जाण्याची भीती
त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात,नागली व वरईचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, मजुरीचा खर्च, लागवडीचा खर्च करून या पिकांची लागवड केली आहे. भात,नागलींच्या रोपांची बऱ्यापैकी वाढ झाल्याने त्यांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे. मात्र, पाऊस नसल्याने भात रोपांना खतेसुद्धा देत येत नसल्यामुळे देवगाव परिसरात शेतकऱ्यांना खरिप हंगाम वाया जाण्याची भीती वाटत आहे. तालुक्यातील दक्षिण भागात भात, नागली व वरई या पिकांचे रोप तयार करून नंतर लावणी केली जात असल्यामुळे एकदा रोप खराब झाल्यावर दुबार लावणी करणे शक्य नसते.त्यामुळे बळीराज्याला वर्षभराच्या पिकांवर पाणी सोडून द्यायची वेळ आली आहे.
-------------------------------
पावसाची दडी
निसर्गाच्या पावसाने लहरीपणाचा साथ देत बळीराज्याबरोबर शेतीच्या नुकसानीचा खेळ खेळावयास घेतला आहे. मध्येच दोन दिवसाला सुरुवात होत नाही तोच पाऊस दडी मारून बसतो.यामुळे लावणीबरोबर इतर शेतीची कामेही रखडली आहेत. शेतकऱ्यांना मेघा पाणी दे अशी म्हणण्याची वेळ आली असून आद्रा नक्षत्रांच्या सरी तरी कोसळतील का असा प्रश्न पडला आहे. तर पावसाने दडी मारल्याने कामे रखडल्याने आता शेतकरी निसर्गाच्या लहरीपणावर नाराजी व्यक्त करून पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा करत आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊन महिना होत आहे. पूर्वी वेळेवर पाऊस पडत असल्याने वेळेस पेरणी व लावणी झाल्यानंतर भाताचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत होते. परंतु, आता पावसाचा लहरीपणाचा सुरू असून ज्या वेळेस पावसाची आवश्यकता असते तेव्हा तो पडत नाही. ज्यावेळेस पाऊस नको असतो, त्यावेळेस पडतो. यामुळे दिवसेंदिवस भात उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे.
------------------
पावसाअभावी भात पिकाची खोळंबलेली आवणी. (०१ देवगाव लावणी)
010721\01nsk_8_01072021_13.jpg
०१ देवगाव लावणी