त्र्यंबकेश्वरचे देवदर्शन आटोपून परतणाऱ्या भाविकांची कार उलटली; मध्य प्रदेशचे पाच भाविक जखमी
By अझहर शेख | Published: August 26, 2023 07:04 PM2023-08-26T19:04:18+5:302023-08-26T19:04:36+5:30
Nashik: त्र्यंबकेश्वर येथून देवदर्शन करून शहराकडे परतणारे मुळ मध्यप्रदेशमधील भाविकांच्या स्कॉर्पिओला गडकरी चौकातील सिग्नलवर शनिवारी (दि.२६) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला.
- अझहर शेख
नाशिक - त्र्यंबकेश्वर येथून देवदर्शन करून शहराकडे परतणारे मुळ मध्यप्रदेशमधील भाविकांच्या स्कॉर्पिओला गडकरी चौकातील सिग्नलवर शनिवारी (दि.२६) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यावेळी भरधाव स्कॉर्पिओची एका मिनी टेम्पोला धडक बसली आणि स्कॉर्पिओ कार चार ते पाच कोलांटउड्या घेत रस्त्यावर उलटली. सदैवाने या अपघातात जीवीतहानी टळली. एकाच कुटुंबातील पाच भाविक जबर जखमी झाले आहेत.
मध्यप्रदेश येथील रावत कुटुंबीय देवदर्शनासाठी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे आले होते. देवदर्शन आटोपून त्यांनी परतीचा प्रवास रात्री स्कॉर्पिओ कारमधून (एम.पी ४२ बीसी ०५७७) सुरू केला. भरधाव कार नाशिक शहरातील गडकरी चौकातील सिग्नल ओलांडत असताना अचानकपणे मिनी टेम्पो (एम.एच१५ जीवी ०९६०) समोर आल्याने त्यास वाचविण्याच्या प्रयत्नात कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकून उलटली; मात्र कारचा वेग जास्त असल्याने कारने चार ते पाच कोलांटउड्या घेतल्या. यावेळी मोठा आवाज झाल्याने आजुबाजुचे काही लोक व रस्त्याने जाणारी वाहने थांबली. त्यांनी त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. जवळच विशेष पोलिस महानिरिक्षकांचे ‘दक्षता’ कार्यालय असल्यामुळे त्याठिकणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी नियंत्रण कक्षाला कळविले.
जखमींना त्वरित कारमधून बाहेर काढत रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चैत्राव चुननी रावत (७०,रा.शिवपुरी, मध्यप्रदेश), त्यांची पत्नी मिलाबाई चैत्राम रावत (६५) त्यांचा पुतण्या रामप्रसाद रूपलाल रावत (५०), त्यांची पत्नी सुशीला रामप्रसाद रावत (५०) यांच्यासह जगन्नाथ मौजी पुंडे (६५) असे जखमी झालेल्या भाविकांची नावे आहेत. या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम संध्याकाळी उशीरापर्यंत सुरू होते.