विकासक अडकणार बाल्कनीच्या फेऱ्यात
By admin | Published: January 24, 2017 12:42 AM2017-01-24T00:42:11+5:302017-01-24T00:42:34+5:30
‘कपाट’प्रश्न सुटणार : पुणे विकास आराखड्यावरून चर्चेला उधाण
नाशिक : महापालिका क्षेत्रात बांधकाम व्यावसायिकांना गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावणारा कपाटाचा प्रश्न पुण्यातील शहर विकास आराखड्याचा विचार करता सुटण्याचे संकेत आहेत. मात्र याच विकास आराखड्यातील नियम नाशिकमध्ये लागू झाल्यास कपाटाच्या प्रकरणातून सुटणारे विकासक बाल्कनीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य सरकाने पुणे शहरासाठी मान्यता दिलेल्या विकास आराखड्यातील तरतुदींनुसार, कपाटाचा भाग खोलीत समावेशामुळे निर्माण झालेला कपाटाचा प्रश्न सुटण्याचे संकेत आहेत. या विकास आराखड्यातील नियम नाशिक शहराच्या विकास आराखड्यातही लागू झाले, तर शहरातील आठ हजार कपाट प्रकरणांपैकी ६० टक्के प्रश्न सुटतील, असा विश्वास बांधकाम क्षेत्रात तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. परंतु याच आराखड्यातील तरतुदी तंतोतंत लागू झाल्यास बांधकाम व्यावसायिकांना बाल्कनी बंद करून तिचा खोलीत समावेश करता येणार नाही. सध्या शहरातील अनेक इमारतींमध्ये बाल्कनी बंद करून ही जागा खोलीत समावेश केला जातो. त्यानंतर केवळ दोन हजार रुपये दंड भरून हे बांधकाम नियमित करण्याचा प्रकार होत असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये समोर आले आहे, परंतु पुण्यातील विकास आराखड्यातील नियमावलीनुसार यापुढे बाल्कनी बंद करता येणार नाही. त्यामुळे विकासक कपाटाच्या प्रकरणातून सुटणारे विकासक बाल्कनीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)