वनौषधींवरील संशोधनातून आयुर्वेदाचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:06 AM2018-11-05T00:06:40+5:302018-11-05T00:07:19+5:30
मानवी आयुष्याच्या स्वास्थ्याविषयी माहिती देणारा वेद म्हणजे आयुर्वेद होय. आयुर्वेदिक औषधींचा मुख्य आधारस्तंभ निसर्ग आहे. निसर्गातील वनौषधींमधील गुणधर्मांवर संशोधन करून आयुर्वेदशास्त्र हे अधिक प्रगत व प्रभावशाली होत आहे. आयुर्वेद हे केवळ शास्त्र नसून ती जीवनशैली आहे. निरामय आरोग्यासाठी आयुर्वेद जीवनशैलीचा अवलंब गरजेचा असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
नाशिक : मानवी आयुष्याच्या स्वास्थ्याविषयी माहिती देणारा वेद म्हणजे आयुर्वेद होय. आयुर्वेदिक औषधींचा मुख्य आधारस्तंभ निसर्ग आहे. निसर्गातील वनौषधींमधील गुणधर्मांवर संशोधन करून आयुर्वेदशास्त्र हे अधिक प्रगत व प्रभावशाली होत आहे. आयुर्वेद हे केवळ शास्त्र नसून ती जीवनशैली आहे. निरामय आरोग्यासाठी आयुर्वेद जीवनशैलीचा अवलंब गरजेचा असल्याचे तज्ज्ञ सांगतात. आयुर्वेदाचा भारतीय संस्कृतीशी थेट संबंध येतो. अॅलोपॅथीअगोदर आयुर्वेदानुसारच औषधोपचार केले जात होते. आयुर्वेदशास्त्राचे धडेदेखील महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातूनच गिरविले जातात. रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी नागरिकांकडून आजही आयुर्वेदावर विश्वास दाखविला जातो. आयुर्वेदाचा निसर्गाशी थेट संबंध असून, निसर्गामध्ये आढळणाऱ्या वनौषधींवर आयुर्वेदाचा औषधोपचार अवलंबून आहे. त्यामुळे दिवसेंदिवस आयुर्वेदामध्ये संशोधन वाढत असून, नैसर्गिकरीत्या वनौषधींचा गुणधर्म शोधून त्याआधारे गोळ्या, द्रव्यरुप औषधे बाजारात उपलब्ध झाली आहे. केवळ काढा, जडीबुटी, तेल यापुरतेच आयुर्वेद मर्यादित राहिलेले नाही
तर त्याहीपलीकडे आयुर्वेद गेले आहे. आयुर्वेदाकडे एक जीवनशैली म्हणून जर बघितले तर मधुमेह, उच्च रक्तदाब, वंध्यत्व, लठ्ठपणा, थॉयराईड यांसारख्या आजारांवरदेखील मात करणे सहज शक्य असल्याचा दावा शहरातील आयुर्वेद तज्ज्ञ करतात.
आयुर्वेद औषधोपचाराद्वारे रोगाचे समूळ उच्चाटन शक्य आहे. आयुर्वेदाचा प्रभाव हळूहळू होतो किंवा उशिराने गुण येतो, हा गैरसमज नागरिकांनी दूर करण्याची गरज आहे. तसेच आयुर्वेदाचे दुष्परिणाम नाही, असे मुळीच नाही. जेथे परिणाम आहे, तेथे दुष्परिणामही असतात.
- डॉ. प्रीती त्रिवेदी, एम.डी
आयुर्वेदाची उपचारपद्धती दीर्घकालीन घ्यावी लागते हा गैरसमज दूर करावा. आयुर्वेदाच्या काही उपचार पद्धतीचे दुष्परिणामदेखील जाणवतात. आयुर्वेद उपचारपद्धती आजही तितकीच प्रभावशाली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार उपचार आयुर्वेदात सांगितले आहे. आयुर्वेदामध्ये संशोधनाला खूप वाव आहे; मात्र त्यास अधिक गती देण्याची गरज वाटते. - डॉ. शीतल सुरजुसे, बी.ए.एम.एस