प्रत्येक नगरसेवकाला ४० लाखांचा विकास निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:26 AM2021-02-18T04:26:18+5:302021-02-18T04:26:18+5:30
नाशिक- गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नगरसेवक आणि प्रभाग विकास निधी हा वादाचा विषय असला तरी आयुक्तांनी अंदाजपत्रकात त्यासाठी ...
नाशिक- गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नगरसेवक आणि प्रभाग विकास निधी हा वादाचा विषय असला तरी आयुक्तांनी अंदाजपत्रकात त्यासाठी सुमारे ५१ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. मात्र, दुसरीकडे गेल्या वर्षी महासभेत घुसखोरी केलेल्या नगरसेवकांच्या कामासाठी कर्ज काढण्यास नकार देणाऱ्या आयुक्तांनी अंदाजपत्रकात अशा कामांना पुन्हा एकदा फाटा दिला आहे. त्यामुळे आयुक्तांनी प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात कामे करण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा शब्द दिल्याने शहरातील दोन उड्डाणपुलांच्या स्थगितीचा निर्णय मागे घेतल्याचे सांगणारे सत्ताधारी तोंडघशी पडले आहेत.
महापालिकेच्या सत्ताकाळात मुळातच नगरसेवक निधी वापरला गेलेला नाही. मात्र, यंदा नगरसेवकांना त्यांचा स्वेच्छाधिकार निधी वापरण्यासाठी विशेष तरतूद करून आयुक्तांनी खूशखबर दिली आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकातून बांधिल खर्च वजा जाता नगरसेवक स्वेच्छाधिकार निधीसाठी दोन टक्के तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम १३ कोटी ३४ लाख रुपये असून प्रत्येक नगरसेवकाला १० लाख ५० हजार रुयांचा स्वेच्छाधिकार निधी मिळणार आहे. तर याच अंदाजपत्रकात प्रभाग विकास निधी अंतर्गत ३८ कोटी १० लाख म्हणजेच प्रत्येक नगरसेवकासाठी ३० लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहेत. या निधीतून प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पाच लाख रुपयांपर्यंतची कामे हाती घेण्यात येणार आहे. या कामांना प्रभाग समिती स्तरावरच मान्यता देण्यात येणार आहे.
दरम्यान, नगरसेवकांनी सूचलेल्या कामांपैकी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या महासभेत काही कामे एका अशासकीय ठरावांच्या आधारे घुसवण्यात आली होती. यातील बहुतांशी कामे रस्त्याची होती. त्यामुळे त्यासाठी आयुक्तांनी कर्ज काढण्यास नकार दिला होता. त्यामुळे भाजपाने मायको सर्कल आणि त्रिमूर्ती चौक येथे उड्डाणपुलासाठी निविदा काढल्या असतानादेखील त्यास स्थगिती देण्याचे पत्र महापौरांनी दिले. त्यानंतर आयुक्तांनी महापौरांना प्रशासकीय अधिकार नसल्याचे सांगितले. त्यामुळे जानेवारी महिन्यातील महासभेत घुसखोरी करून पुलांच्या कामांना स्थगिती देण्याचा ठराव तयार केला. मात्र, त्यानंतर आयुक्तांनी पुलांसाठी कार्यवाही सुरूच ठेवली. बुधवारी (दि.१७) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठका होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र, त्यांनी भाजपाने भूमिका बदलली. भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी मात्र आयुक्तांनी दिलेल्या शब्दानुसार सर्व नगरसेवकांच्या प्रभागात १६५ कोटी रुपयांची कामे धरण्यात येतील असे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात मात्र अशी कोणतीच नॉन बजेटेड कामे घेतले नसल्याचे आयुक्तांनी पत्रकार परीषदेत सांगितले.
इन्फो...
उड्डाणपुलांसाठी तरतूद
मायको सर्कल आणि त्रिमूर्ती चौक येथे उड्डाणपुलासाठी २४५ कोटी रुपयांचा खर्च येणार असला तरी हे दोन्ही पूल तीन वर्षात पूर्ण करायचे असल्याने त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. परंतु नगरसेवकांची जी नियमित कामे असतात, त्यासाठी कर्ज काढण्याची गरज नाही.
- कैलास जाधव आयुक्त, महापालिका