डोंगराळेच्या ग्रामस्थांना आदर्श करंजगावच्या विकासाची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:21 PM2020-12-16T16:21:39+5:302020-12-16T16:22:03+5:30
निफाड तालुक्यातील विकासाचे मॉडेल
सायखेडा : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे.येथील ग्रामस्थांनी निफाड तालुक्यातील विकासाचे मॉडेल असलेल्या आदर्श करंजगावच्या विविध विकासकामांची पाहणी केली. दादासाहेब ठाकरे, भरत भदाणे यांच्यासह डोंगराळे येथील चाळीस युवकांनी करंजगावच्या विकासकामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
डोंगराळेचे भूमिपुत्र व आदर्श करंजगावचे ग्रामविकास अधिकारी प्रमोद खैरनार यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. करंजगाव ग्रामपालिकेने साकारलेला घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, वृक्षारोपण, व्यायामशाळा, अभ्यासिका, भूमिगत गटारी आदी विविध विकासकामांची पाहणी या शिष्टमंडळाने केली. सरपंच खंडू बोडके-पाटील व प्रमोद खैरनार यांनी विकासकामांची माहिती ग्रामस्थांना दिली. आदर्श करंजगावच्या विकासाचा आदर्श घेऊन डोंगराळे गावालाही आदर्श गाव बनविण्याचा निर्धार यावेळी भरत भदाणे यांनी केला. खंडू बोडके-पाटील यांनी आभार मानले.यावेळी सरपंच वसंत जाधव, सागर जाधव, सोमनाथ भगूरे कैलास टिळे, सुखदेव भगूरे, दीपक पवार व ग्रामपालिका कर्मचारी उपस्थित होते.