नाशिक क्रिकेटचा विकास ही सामूहिक जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:24 PM2018-07-29T23:24:11+5:302018-07-29T23:24:29+5:30
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीत खेळाडू पॅनलने सर्वच जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनलने न्यायालयात दाखल केलेली याचिका आणि खेळाडू पॅनलवर अकार्यक्षमतेचा आरोपही केला. प्रचाराचा कोणताही गाजावाजा न करताही खेळाडू पॅनलने मात्र परिवर्तनचा सरळ सरळ पराभव केला. या विजयाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू पॅनलचे प्रमुख आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांच्याशी साधलेला संवाद.
२००३ पासून नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा कारभार सांभाळत असताना पंधरा वर्षांनंतरही पारदर्शकतेचा मुद्दा विरोधी गटाकडून उपस्थित केला जातो. यामुळे विश्वास टिकविण्याचे आव्हान वाटते का?
सन २००३ पासून ते आजवर नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या प्रगतीसाठी काय केले आणि आणि किती काम उभे राहिले हे सदस्य,सभासदांच्या समोर आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रश्न नाही. परंतु हे आरोप असे लोक करतात की ज्यांना क्रिकेटचे काम आणि त्याबाबतचा अनुभव नाही. ज्यावेळी असे आरोप केले जातात त्यावेळी आरोप करणाऱ्यांचेच खरे स्वरूप बाहेर
येते. या निवडणुकीतही तेच झाले. आरोप करणे सोपे असते, परंतु त्यासाठी काहीतरी धागा असावा लागतो. विरोधकांकडे असा कोणताही मुद्दा नसल्याने मतदारांनी त्यांना जागा दाखविली असे म्हणता येईल.
निवडणुकीतील या यशामुळे आपल्यावरील आणि पॅनलवरील विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे. यापुढील कामकाज कशा पद्धतीचे असेल?
निवडणूक ही निवडणुकीसारखी लढायची असते. निवडणुकीनंतर क्रिकेटच्या विकासाचा मुद्दाच प्राधान्यावर असतो. असोसिएशनचे सर्वच सभासद क्रिकेटच्या विकास प्रक्रियेचा एक भाग आहेत. क्रिकेटच्या विकासासाठी हे सर्व घटक महत्त्वाचे असतात. चांगल्या कामासाठी प्रसंगी विरोधकही क्रिकेटच्या हिताचाच निर्णय घेऊन असोसिएशनला सहकार्य करतील. शेवटी नाशिक जिल्हा क्रिकेटचा विकास हा महत्त्वाचा असतो. निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोप हे निवडणुकीनंतर संपुष्टात येतात क्रिकेटसाठी हे सर्व लोक आमच्याबरोबरच राहतील.
शहराबरोबरच तालुका आणि ग्रामीण भागातील क्रिकेटही तितकेच महत्त्वाचे आहे. याविषयी काय व्हिजन आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने जिल्हा पातळीवरील क्रिकेटच्या विकासासाठी भरीव काम केले आहे. असोसिएशनने आखलेल्या रोड मॅपनुसार शहरातील सेंटर्सची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. शहरातील विविध भागांतून खेळाडू नाशिक गोल्फ क्लबवर येतात. शहरातील उपनगरांमध्ये सेंटर्सची संख्या वाढविण्यात येईल. तालुक्यापर्यंत असोसिएशनचा विस्तार झाला आहेच तो अधिक बळकट केला जाणार आहे. तालुक्यात क्रिकेटचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जाईल. असोसिएशनशी संबंधित पदाधिकारी, क्लब, आजीवन सदस्य, सभासद आणि खेळाडूंमुळेच नाशिकच्या क्रिकेटला राज्य, राष्टÑीय पातळीवर ओळख मिळाली आहे. म्हणूनच नाशिकला बेस्ट क्रिकेट असोसिएशनचा महाराष्टÑ क्रिकेट असोसिएशनचा अवॉर्ड मिळालेला आहे.
आगामी काळात नाशिकमध्ये मोठ्या क्रिकेट मॅचेस बघण्यास मिळू शकतात का?
निश्चितच, त्यासाठीची सज्जता असोसिएशनने केलेली आहे. अजूनही आधुनिक तंत्रपद्धतीचा वापर करण्यात येत आहे. आजवर नाशिकने अकरा रणजी सामन्यांचे यशस्वी आयोजन केलेले आहे. तसेच एमसी आय आणि बिसीसीआयच्या विविध वयोगटांतील सात स्पर्धादेखील नाशिक क्रिकेट असोसिएशन आयोजन करीत असते. नाशिकमध्ये रणजी सामने घेण्याची पूर्ण क्षमता असून, नाशिकला रणजी सामने मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे. (शब्दांकन : संदीप भालेराव)