गंजमाळ येथे वाहनतळाचा विकास वादाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:51+5:302021-06-04T04:12:51+5:30
नाशिक- शहरात वाहनतळासाठी आरक्षित भूखंड ए आर म्हणजेच समावेशक आरक्षण पद्धतीने विकसित करण्याचे यापूर्वीची सर्वच प्रकरणे वादात सापडली असून ...
नाशिक- शहरात वाहनतळासाठी आरक्षित भूखंड ए आर म्हणजेच समावेशक आरक्षण पद्धतीने विकसित करण्याचे यापूर्वीची सर्वच प्रकरणे वादात सापडली असून विकासकांनी त्यावर सरळ सरळ या भूखंडाचा वापर आपल्यासाठीच सुरू ठेवल्याचे प्रकार ताजे असताना गंजमाळ येथील वाहनतळासाठी आरक्षित भूखंड समावेश आरक्षणाखाली संबंधित विकासकाकडून विकसित करण्याचे घाटत आहेत. त्यास विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी विरोध केला आहे.महापालिकेच्या विकास आराखड्यात विविध आरक्षणे असतात. ते ताब्यात देखील घेतले जातात. मात्र समावेश आरक्षण पद्धतीने वाहनतळाचे आरक्षण मूळ मालकांकडून विकसित घेताना महापालिकेचे नुकसान झाले आहे. शिवाय जागा मालकांनी त्यावर व्यापारी संकुले बांधल्याने त्यांचा कोणताही वापर नागरिकांना होत नसल्याने अशाप्रकारे पुन्हा एआरचा वापर किमान वाहनतळाच्या आरक्षणासाठी करू नये अशी मागणी बोरस्ते यांनी केली आहे.
मौजे नाशिक या गावठाणातील सर्व्हे नं ६३१/अ/२ यांसी क्षेत्र ३४४३.७५ यातील अंतिम भूखंड क्रमांक
१५७ हा पूर्वी कब्रस्तानसाठी आरक्षित होता. मात्र २०१७ मध्ये नव्या शहर विकास आराखड्यात त्यावर वाहनतळाचे आरक्षण दर्शविण्यात आले आहे. हा भाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून शाळा तसेच बाजारपेठा आणि अन्य व्यावसायिक संकुले असल्याने याठिकाणी वाहनतळ झाल्यास त्याचा नागरिकांसाठी वापर होणार आहे. मात्र, वाहनतळाची जागा रीतसर ताब्यात घेऊन महापालिकेनेच ते विकसित करणे आवश्यक आहे. मूळ मालकाकडून विकसित केल्यास पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होणार आहेत, असे बोरस्ते यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
इन्फो..
यापूर्वी काळाराम मंदिर, मुंबई नाका, कॅनडा कार्नर अशा अनेक ठिकाणी वाहनतळ विकसित करून देखील फायदा झालेला नाही. त्यातच गंजमाळ येथील जागा प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून भाडे नियंत्रण कायद्याअंतर्गत देखील वाद सुरू आहे. त्यामुळे महापालिकेला अकारण त्यात त्रास होऊ शकतो. अशावेळी महापालिकेने कुठल्याही परिस्थितीत एआर खाली आरक्षण विकसित करण्यास देऊ नये अन्यथा शिवसेना आंदोलन करेल असा इशारा बोरस्ते यांनी दिला आहे.