विकास नियमावली पुढील आठवड्यात?
By admin | Published: February 23, 2017 12:27 AM2017-02-23T00:27:01+5:302017-02-23T00:27:13+5:30
उत्सुकता : मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा
नाशिक : महापालिका निवडणूक काळात सोशल मीडियावर व्हायरल झालेली शहर विकास नियंत्रण नियमावली विरोधकांचा कपोलकल्पित उद्योग असल्याचे जाहीर स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या सभेत दिल्यानंतर आता पुढील आठवड्यात विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने महापालिका निवडणुकीपूर्वी नाशिकचा शहर विकास भागश: आराखडा घोषित केला, परंतु सोबत शहर विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे शहरातील ‘कपाट’ आणि ‘टीडीआर’चा विषय प्रलंबितच राहिलेला आहे. सदर नियमावली प्रसिद्ध व्हावी यासाठी शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांसह नगरविकास सचिवांनी याबाबत आश्वासनेही दिली, परंतु नियमावली प्रसिद्ध होऊ शकली नाही. दरम्यान, निवडणूक आचारसंहितेत नियमावली अडकल्याचे सांगत ती लांबविली जात असल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिकांसह भाजपा विरोधक राजकीय पक्षांकडून केला गेला. त्यातच महापालिका निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना सोशल मीडियावर २०६ पानांची शहर विकास नियंत्रण नियमावली व्हायरल झाली. त्यात ‘कपाट’चा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे भासविण्यात आले असले तरी बाल्कनीबाबत अडसर निर्माण झाल्याचे दर्शविण्यात आले. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर होता. सदर नियमावली खरी की खोटी यावर चर्चा झडल्या. मात्र, भाजपा शहराध्यक्षांसह पालकमंत्र्यांनी व्हायरल नियमावली खोटी असल्याचे स्पष्टीकरण दिले तर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना छेडल्यानंतर फडणवीस यांनी नाशिकच्या जाहीर सभेत सदर नियमावली कपोलकल्पित असल्याचे स्पष्ट केले व ‘कपाट’चा मुद्दा मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. गुरुवारी महापालिका निवडणुकीची मतमोजणी होत असून, , त्यावर विकास नियंत्रण नियमावलीचे भवितव्य ठरणार असल्याची चर्चा बांधकाम व्यावसायिकांमध्ये आहे. मात्र, पुढील आठवड्यात कोणत्याही स्थितीत विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध होण्याचे सूतोवाच भाजपाच्या एका नेत्याने केले आहे. (प्रतिनिधी)