विकास हा पर्यावरणाचा ‘मित्र’ व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 01:15 AM2021-10-01T01:15:47+5:302021-10-01T01:16:16+5:30

अलीकडे विकास आणि पर्यावरण हा विरुद्ध अर्थी शब्द वाटायला लागला आहे. वास्तविक या दोन्हीबाबत संयमाने विचार करण्याची अपेक्षा असताना यामध्ये घाई होताना दिसते. विकास करणे म्हणजे सर्वच ओरबाडणे असे नव्हे तर निसर्गाने जे दिले ते जपले देखील आहे. त्यामुळे विकास हा पर्यावरणाचा मित्र व्हावा या दृष्टीने नियोजन झाले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Development should be a 'friend' of the environment | विकास हा पर्यावरणाचा ‘मित्र’ व्हावा

विकास हा पर्यावरणाचा ‘मित्र’ व्हावा

googlenewsNext
ठळक मुद्देउद्धव ठाकरे : ‘मित्रा’ संस्थेच्या ई-उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक: अलीकडे विकास आणि पर्यावरण हा विरुद्ध अर्थी शब्द वाटायला लागला आहे. वास्तविक या दोन्हीबाबत संयमाने विचार करण्याची अपेक्षा असताना यामध्ये घाई होताना दिसते. विकास करणे म्हणजे सर्वच ओरबाडणे असे नव्हे तर निसर्गाने जे दिले ते जपले देखील आहे. त्यामुळे विकास हा पर्यावरणाचा मित्र व्हावा या दृष्टीने नियोजन झाले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात मित्रा या संस्थेच्या नाशिकरोड येथील नवीन इमारत व मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते. कार्यक्रमस्थळी पालकमंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, आमदार सरोज अहिरे, नरेंद्र दराडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पाणी आणि स्वच्छतासंबंधी संशोधन करणाऱ्या या संस्थेमुळे घराघरात शुद्ध पाणी पोहचविण्याच्या राज्याच्या योजनेला बळकटी मिळण्यास मदतच होणार आहे. पाणी आणि स्वच्छता या दोन्ही महत्त्वाच्या गरजा असल्याने नागरिकांच्या हितासाठीचे संशोधन या ठिकाणी होणार असल्याने केवळ राज्यातीलच नव्हे तर परराज्यातील, परदेशातील तज्ज्ञांना येथे प्रशिक्षण देता येऊ शकेल. सध्या पुराचे पाणी घरात आणि घरातील नळाला पाणीच नाही अशी परिस्थिती होतांना दिसते. आपणाला हे चित्र बदलावे लागेल. प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहचेल आणि पुराचे पाणी घरापर्यंत येणार नाही अशी विकासाची संकल्पना राबवावी लागणार आहे. प्रदूषण टाळून विकास करता आला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नागरिकांना गुणवत्तापूर्ण पाणी देण्याची शासनाची जबाबदारी आहेच, परंतु नागरिकांनीदेखील पाणी जपून वापरण्याचे आणि जलस्त्रोत जपण्याचे भान राखले पाहिजे. यासाठी अजूनही जलसाक्षरता राबविण्याची आवश्यकता आहे. पाण्याची गुणवत्ता आणि पाण्यातील पोषक घटक कसे जपले जातील याबाबतचेही संशोधन गरजेचे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे यांनीही मनोगत व्यक्त केले.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव डॉ. संजय चहांदे यांनी प्रास्ताविक केले.

--इन्फो--

मित्रो आणि मित्रा

महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात ‘मित्रा’ हे नाव आपल्याला आवडल्याचे भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले. मित्रा या नावामुळे आपणाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मित्रो’ या शब्दाची आठवण झाल्याचे सांगितले.

--इन्फो--

भुजबळ साहेब, जरा थांबावे लागेल

नाशिक हा शेतीप्रधान जिल्हा आहे त्यामुळे मित्रा या संस्थेप्रमाणेच नाशिकला अत्याधुनिक कृषी भवन निर्माण व्हावे, अशी अपेक्षा भुजबळ यांनी भाषणात व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात भुजबळ यांच्या मागणीचा धागा पकडत नुकतेच पुणे येथे २२२ कोटींचे अत्याधुनिक कृषी भवन तयार करण्यात आल्याचे सांगत भुजबळ यांना आणखी काही काळ थांबावे लागेल, असे म्हटले.

Web Title: Development should be a 'friend' of the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.