मालेगावच्या विकासाची कवाडे होणार खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:51 AM2019-06-14T00:51:21+5:302019-06-14T00:52:47+5:30
मालेगावचे अर्थकारण बदलून टाकणारी आणि बकालपण घालविणारी महत्त्वपूर्ण घटना शुक्रवारी (दि.१४) घडत असून, बहुप्रतीक्षित औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ होत आहे. या वसाहतीमुळे मालेगावच्या विकासाची कवाडे खुली होणार असून, अनेकांच्या हातांना काम उपलब्ध होणार आहे. या औद्योगिक वसाहतीला शासनाने डी प्लस झोनचा दर्जा दिल्यामुळे मालेगावच्या दृष्टीने औद्योगिक विकासासाठी हा एक मोठा टप्पा मानला जात आहे.
अतुल शेवाळे । लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : मालेगावचे अर्थकारण बदलून टाकणारी आणि बकालपण घालविणारी महत्त्वपूर्ण घटना शुक्रवारी (दि.१४) घडत असून, बहुप्रतीक्षित औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ होत आहे. या वसाहतीमुळे मालेगावच्या विकासाची कवाडे खुली होणार असून, अनेकांच्या हातांना काम उपलब्ध होणार आहे. या औद्योगिक वसाहतीला शासनाने डी प्लस झोनचा दर्जा दिल्यामुळे मालेगावच्या दृष्टीने औद्योगिक विकासासाठी हा एक मोठा टप्पा मानला जात आहे.
मालेगाव शहराच्या बकालपणाबाबत नेहमीच चर्चा होत असते. इतिहासात झालेल्या काही दंगलींमुळे मालेगाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून येथील नागरिकांनी सामंजस्याचा परिचय देत दंगलीचा डाग पुसून काढला असून, नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्यानंतर शहराच्या रंगरुपानेही कात टाकण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येत आहे. याचसोबत मालेगावचा औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने येथे औद्योगिक वसाहत उभारण्याबाबतची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. याविषयी वेळोवेळी निर्णयही घेण्यात येत होते. परंतु, जागेची उपलब्धता व वीज-पाणी आदी सुविधांची कमतरता यामुळे उद्योजक उद्योग उभारणीसाठी पुढे येताना कचरत होते.
शेती महामंडळाच्या ५ हजार एकर पैकी पहिल्या टप्प्यात ८६३ एकर जमीन ३८ कोटी रुपयात औद्योगिक वसाहतीला मिळाली असून, ५०० चौरस मीटर पासून ४५ एकरपर्यंतचे भूखंड तयार करण्यात आलेले आहेत.मूलभूत सेवा सुविधांसाठी शासनाने ३५ कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे.
या वसाहतीत पॉवरलुम, प्लास्टिक रिसायकल युनिट, प्लॅस्टिक रियुज युनिट असून यासह इंजिनिअरिंग उद्योग यावेत अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी १ हजार एकर जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे.
दरम्यान, मालेगाव आद्योगिक क्षेत्र टप्पा २ सायने (२८३ एकर) आणि टप्पा ३ अजंग-रावळगाव (८६३ एकर) औद्योगिक वसाहतीसाठीच्या भूखंड नोंदणीचा शुभारंभ तसेच उद्योजक परिषद शुक्रवारी (दि.१४) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजिण्यात आली आहे.यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार सुभाष भामरे, महापौर शेख रशीद, आमदार शेख आसीफ व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
शेती महामंडळाची जमीन
जुलै २०१७ मध्ये अजंग येथील शेती महामंडळाची ३४५.२५ हेक्टर जमिन एमआयडीसीसाठी देण्यास शासनाने मंजुरी दिली होती तसेच या जमिनीस उद्योग विभागाने औद्योगिक क्षेत्र म्हणूनही जाहीर केल्याने या प्रक्रियेला चालना मिळाली होती. याशिवाय, मालेगाव व परिसरातील ३०० पेक्षा अधिक लघुउद्योजकांची यादीही शासनाकडे सुपुर्द करण्यात आली होती.
वसाहतीसाठीच्या पाण्याची समस्या सोडविताना चणकापुर आणि पुनद धरणातून पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. याशिवाय गिरणा धरणातून शाश्वत पाणी पुरवठा केला जाणार आहे.
सुरु वातीला शासनाने दीड हजार रु पये दर ठेवला होता. परंतु पाठपुरावा करु न आता फक्त ८०० रूपये दर ठेवण्यात आला आहे.