सभापतिपदांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:37 AM2020-01-04T00:37:30+5:302020-01-04T00:49:58+5:30
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर व राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड या दोघांची बिनविरोध निवड झाल्यानंतर विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी मात्र मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व कायम राखत चारही सभापतिपदांवर विजय मिळविला, तर भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. शिवसेनेच्या सुरेखा दराडे, सुशीला मेंगाळ, तर राष्टÑवादीचे संजय बनकर व कॉँग्रेसच्या अश्विनी आहेर या चौघांची सभापतिपदी निवड करण्यात आली.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर व राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड या दोघांची बिनविरोध निवड झाल्यानंतर विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी मात्र मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व कायम राखत चारही सभापतिपदांवर विजय मिळविला, तर भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. शिवसेनेच्या सुरेखा दराडे, सुशीला मेंगाळ, तर राष्टÑवादीचे संजय बनकर व कॉँग्रेसच्या अश्विनी आहेर या चौघांची सभापतिपदी निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी एकत्र आलेली असली तरी, विषय समित्यांच्या वाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेबनाव निर्माण झाला. विषय समित्यांचे वाटप कसे करावे याबरोबरच प्रत्येक पक्षातील इच्छुकांना थांबविण्यासाठी नेत्यांना मोठी कसरत करावी
लागली.
शिवसेना दोन समित्यांवर व त्यातही महत्त्वाच्या समित्यांवर अडून बसल्याने राष्टÑवादीनेही तितक्याच तीव्रतेने त्यास विरोध केला. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची परिस्थिती निर्माण होऊन राष्टÑवादीने थेट भारतीय जनता पक्षाशी बोलणी सुरू केल्याने सेनेने नमते घेतले. परिणामी महाविकास आघाडी एकसंध राहू शकली.
या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे दोन सदस्य गैरहजर राहिले तर माकपाच्या एका सदस्याने तटस्थ राहत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीत फाटाफूट होण्याच्या शक्यतेने भाजपने गुप्त मतदानाचा आग्रह धरला तो पीठासीन अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला.
दुपारी १२ वाजता विशेष सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्यावेळी महिला व बाल कल्याण, समाज कल्याण व दोन विषय समिती सभापतिपदासाठी नामांकन दाखल करण्यात आले. त्यात प्रत्येक सभापतिपदासाठी भाजप व माकपाच्या उमेदवारांनी नामांकन दाखल केले. त्यामुळे तिरंगी उमेदवार रिंगणात राहिल्याने अर्ज छाननीनंतर पीठासीन अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माघारीसाठी पंधरा मिनिटांचा कालावधी दिला.
समाज कल्याण सभापतिपदी मेंगाळ
समाज कल्याण समितीच्या सभापतिपदासाठी माकपाच्या अनिता बोडके, भाजपच्या आशा जगताप व शिवसेनेच्या सुशीला मेंगाळ या तिघांनी नामांकन अर्ज दाखल केले. अर्ज माघारीत अनिता बोडके यांनी माघार घेतल्याने सरळ सरळ लढत होऊन त्यात सेनेच्या सुशीला काशीनाथ मेंगाळ यांना ५३ मते मिळाली, तर भाजपच्या आशा जगताप यांना १५ मते मिळाली. माकपाचे रमेश बरफ हे तटस्थ राहिले, तर अनिता बोडके यांनी मतदान केले नाही. त्यामुळे सुशीला मेंगाळ विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. ही घोषणा होताच सत्ताधारी बाकांवरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बांधकाम राष्टÑवादी, तर शिक्षण खाते शिवसेनेकडे
दोन विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्टÑवादीचे संजय बनकर व शिवसेनेच्या सुरेखा दराडे यांची निवड करण्यात आली असली व त्यांच्या खात्यांचे वाटप झाले नसले तरी, महाविकास आघाडीत झालेल्या समझौत्यानुसार संजय बनकर यांच्याकडे बांधकाम खाते, तर सुरेखा दराडे यांच्याकडे शिक्षण व आरोग्य सभापतिपद देण्यात येणार आहे. उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन तर सेनेच्या सुशीला मेंगाळ यांच्याकडे समाज कल्याण, कॉँग्रेसच्या अश्विनी आहेर यांच्याकडे महिला व बाल कल्याण समिती देण्यात आली आहे.
गुप्त मतदानाची मागणी फेटाळली
सभागृहाचे कामकाज सुरू होताच, भारतीय जनता पक्षाच्या पंधरा सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र आत्माराम कुंभार्डे यांनी पिठासीन अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सोपवून या निवडणुकीत अनेक सदस्यांना गोपनीय मतदान करावयाचे असल्याने विषय समिती सभापतिपदासाठी गुप्त मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली. परंतु कायद्यात तशी तरतूद नसल्याचे सांगून पिठासीन अधिकाऱ्यांनी सदरची मागणी फेटाळून हात उंचावून मतदान होणार असल्याचे जाहीर केले.