Devendra Fadanvis: भाजपचे मिशन बारामती नव्हे तर महाराष्ट्र, उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
By अमोल यादव | Published: August 30, 2022 05:42 PM2022-08-30T17:42:23+5:302022-08-30T17:43:06+5:30
नाशकात सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनात मंगळवारी (दि. ३०) ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते
नाशिक : श्री चक्रधर स्वामींनी मराठी भाषेतील पहिला ग्रंथ लिहिला त्या रिद्धपुरला मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच भाजपचे मिशन बारामती नसून महाराष्ट्र असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगीतले.
नाशकात सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनात मंगळवारी (दि. ३०) ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, रिद्धपुरला मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी २०१४ मध्ये समिती स्थापन नेमली होती. समितीचा अहवालही आला होता. मात्र २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हा विषय मागे पडला. चक्रधर स्वामींच्या अष्ठशताब्दी निमित्ताने या विद्यापीठासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहे.
LIVE | भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन, नाशिकhttps://t.co/0fu3ggu1Ix
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 30, 2022
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा देखील झाली आहे. लवकरच बैठक देखील होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बारामती दौऱ्याबाबत माध्यमांनी विचारले असता, भाजपचे मिशन बारामती नव्हे तर महाराष्ट्र असल्याचे त्यांनी सांगितले.