त्र्यंबकेश्वरी धार्मिक विधींसाठी देवेंद्र फडणवीसांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:20+5:302021-07-12T04:10:20+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील धार्मिक विधी व त्यावर अवलंबून असलेले व्यवसाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दीड वर्षापासून बंद आहेत. दुसऱ्या ...
त्र्यंबकेश्वर : येथील धार्मिक विधी व त्यावर अवलंबून असलेले व्यवसाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दीड वर्षापासून बंद आहेत. दुसऱ्या लाॅकडाऊननंतर १ जून २०२१ पासून शासनाने सर्व व्यवसाय, लग्न सोहळे, समारंभ अटी व शर्तीनुसार पाच टप्प्यांमध्ये सुरू केलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार त्र्यंबकेश्वर येथे होणारे धार्मिक विधी सुरू करण्यास अनुमती मिळवून द्यावी या मागणीसाठी त्र्यंबकेश्वर भाजपच्या वतीने विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्यात आले.
फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर व येथे होणारे धार्मिक विधी यावरच येथील सर्व व्यावसायिक- फूल विक्रेते, हॉटेल, लाॅजिंग, नाभिक, रिक्षा व टॅक्सी चालक, धार्मिक विधीचे कपडे विक्रेते, पूजा साहित्य विक्रेते, तसेच हातावर पोट भरणारे अन्य घटक व पुरोहित वर्गाची उपजीविका अवलंबून आहे. इतर सर्व व्यवसाय व आस्थापना शासनाने सुरू केलेले असताना धार्मिक विधी सुरू करण्याकरिता वारंवार विनंती करूनदेखील शासन दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करीत त्र्यंबकेश्वरचे अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी शहराध्यक्ष सुयोग वाडेकर व तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते ॲड. श्रीकांत गायधनी, जिल्हा चिटणीस तृप्ती धारणे, प्रशांत बागडे, त्रिवेणी तुंगार, तालुका सरचिटणीस हर्षल भालेराव, मिलिंद धारणे, बाळासाहेब अडसरे, पंकज धारणे, रामचंद्र गुंड, विराज मुळे, रवींद्र (बाळा) सोनवणे, पंकज भुजंग, योगेश गंगापुत्र आदी उपस्थित होते.
इन्फो
विधीस यंत्रणांचा मज्जाव
त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित शासकीय नियमानुसार मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत योग्य ती खबरदारी घेऊन धार्मिक पूजा विधी करण्यास तयार आहेत. इतर सर्व तीर्थक्षेत्री व शहरांमध्ये धार्मिक विधी सुरू आहेत. असे असताना श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या धार्मिक पूजा विधी करण्यास संबंधित शासकीय यंत्रणा मज्जाव करीत आहे.