देवगाव - श्रीघाट रस्त्यांवर तिसऱ्यांदा मलमपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 12:46 AM2020-12-06T00:46:44+5:302020-12-06T00:47:12+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव - श्रीघाट, देवगाव - वावीहर्ष या तीन-तीन किलोमीटर मार्गावरील रस्त्यांवर गेल्या एक ते दीड वर्षांपासून पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रवाशांच्या मागणीचा विचार केला जात नसल्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. वाहनचालकांची दैना होत असल्याने लोकमतने रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी सविस्तर बातमी प्रकाशित केली होती. त्या वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांतील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले.
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव - श्रीघाट, देवगाव - वावीहर्ष या तीन-तीन किलोमीटर मार्गावरील रस्त्यांवर गेल्या एक ते दीड वर्षांपासून पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रवाशांच्या मागणीचा विचार केला जात नसल्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. वाहनचालकांची दैना होत असल्याने लोकमतने रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी सविस्तर बातमी प्रकाशित केली होती. त्या वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांतील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले.
सरकारी काम आणि बारा महिने थांब, अशी म्हण आहे. परंतु, गेल्या चार ते पाच वर्षांपासून देवगाव परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट होऊन संपूर्ण रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघातही झाले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांवर दोन वेळा खड्डे बुजविण्याचे काम केले. मात्र वाहनांची वर्दळ आणि पावसामुळे रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’ झाल्यामुळे रस्त्यांच्या कामांना मुहूर्त कधी लागणार, असा सवाल वाहनचालकांमधून विचारला जात आहे. अशातच सार्वजनिक बांधकाम विभागाने तिसऱ्यांदा रस्त्यावरील खड्ड्यांवर मलमपट्टी केली.
------------------------------------------------------------
इन्फो
डांबरीकरण कधी?
गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या विघ्नामुळे रस्त्यांच्या कामाला ब्रेक लागला होता. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना रस्त्यांच्या कामांना मुहूर्त कधी? रस्त्याच्या दुरवस्थेमुळे खड्ड्यातून मार्गक्रमण करताना जिकिरीचे होत आहे. त्यामुळे फक्त खड्डे न बुजविता डांबरीकरण कधी? केले जाईल, असा सवाल वाहनचालक करत आहेत.
------------------------------------------------------------
कोट...
देवगाव ते श्रीघाट या मार्गावरील रस्त्याच्या कामांचे प्रस्ताव सादर केले असून, प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच कामांना सुरुवात केली जाईल. तसेच देवगाव फाट्यावरील नादुरुस्त झालेली दिशादर्शक त्रिफुलीचीही दुरुस्ती केली जाईल.
- यशपाल ठाकूर, अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, त्र्यंबकेश्वर