देवीदास पिंगळे यांना अटक

By admin | Published: December 22, 2016 12:55 AM2016-12-22T00:55:13+5:302016-12-22T00:55:31+5:30

एसीबीची कारवाई : कृउबाच्या ५७़७३ लाख रुपयांचा तिढा

Devidas Pingale arrested | देवीदास पिंगळे यांना अटक

देवीदास पिंगळे यांना अटक

Next

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तिघा कर्मचाऱ्यांकडून दोन महिन्यांपूर्वी जप्त करण्यात आलेली ५७़७३ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास आनंदा पिंगळे यांना देण्यासाठी जात असल्याचे पुरावे उपलब्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि़ २१) दुपारी पिंगळे यांना अटक केली़ दरम्यान, त्यांचे घर तसेच कार्यालयाची अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात असून, गुरुवारी (दि़ २२) न्यायालयात हजर केले जाणार आहे़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केलेल्या बेहिशेबी रकमेबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर सुमारे दोन महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास सुरू होता़ पोलीस अधिकाऱ्यांकडे देवीदास पिंगळे यांच्याविरोधात सबळ पुरावे उपलब्ध झाल्याने शनिवारी (दि़ १७) चौकशीसाठी बोलविण्यात आले होते़ मात्र, वकिलामार्फत बाहेरगावी असल्याचा अर्ज पाठवून त्यांनी बुधवारची (दि़ २१) वेळ मागून घेतली होती़
सभापती पिंगळे हे बुधवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले़ दुपारी साडेचार वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत देशपांडे यांच्याकडून चौकशी सुरू होती़; मात्र या चौकशीत पिंगळे यांनी सहकार्य केले नसल्याचे तसेच प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने पाच वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली़ दरम्यान, सभापती देवीदास पिंगळे यांनी चौकशीचा ससेमिरा (पान ५ वर)

टाळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ बी़ भोस यांच्या न्यायालयात मंगळवारी (दि़ २०)अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ या अर्जावर बुधवारी (दि़ २१) सुनावणी होणार होती; मात्र तत्पूर्वीच पिंगळे यांनी न्यायालयातील जामीन अर्ज नॉट प्रेस (पाठीमागे घेतला) केला़ तर मूळ अर्जावर २८ डिसेंबरला सुनावणी होणार आहे़ मात्र, तत्पूर्वीच पिंगळे हे चौकशीला गेल्यानंतर एसीबीने त्यांना अटक केली़ (प्रतिनिधी)
काय आहे प्रकरण़़़
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी मिळणारे सानुग्रह अनुदान व वेतनातील फरकाची रक्कम सेल्फ बेअरर चेकवर बळजबरीने सह्णा घेऊन पेठ नाक्यावरील एनडीसीसी बँकेतून काढून ती एका पदाधिकाऱ्याकडे पोहोचवली जाणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती़ त्यानुसार २५ आॅक्टोबर २०१६ रोजी सापळा रचून सायंकाळी समितीचे कर्मचारी तथा संचालकाचे सचिव विजय निकम, अरविंद जैन (लेखापाल), दिगंबर चिखले (लिपिक) हे जात असलेल्या स्विफ्ट डिझायर (एमएच १५, सीएम २१८०) कारमधून ५७ लाख ७३ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त केली़ या तिघांवरही म्हसरूळ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती़ त्यांनी ही रक्कम कर्मचाऱ्यांची असल्याची माहिती दिली; मात्र ती कोणाकडे घेऊन जात होते याबाबत माहिती दिली नाही़ दरम्यान, या तिघांनाही अटक करून पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती़
तपासात काय आढळले़़़
* नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नाशिकरोड शाखेतील नऊ कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवरून चार लाख ७८ हजार रुपये काढून ते सभापती पिंगळे यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वीकारण्याचा पुरावा आढळून आला आहे़
* मे २०१४ मध्ये कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करताना कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवरून एकाच दिवशी रकमा लाच म्हणून काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़
* सभापती पिंगळे यांच्या आदेशावरून समितीच्या अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना काढल्याचे समोर आले असून, अटक आरोपी व पिंगळे यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाचा शास्त्रीय पुरावाही मिळाला आहे़
* समितीच्या कर्मचाऱ्यांकडे जप्त करण्यात आलेली ५७ लाख ७३ हजार ८०० रुपयांची रक्कम सभापती पिंगळे यांना देण्यासाठी जात असल्याचे तपासात आढळून आले आहे़
* या प्रकरणाचा तपास साक्षीदारांकडे सुरू असताना देवीदास पिंगळे हे धमकावत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत़
२५ आॅक्टोबर २०१६ रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची मोठी रक्कम समितीतील एका उच्चपदस्थ पदाधिकाऱ्याकडे पोहोचवली जाणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून समितीच्या तिघा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून ५७ लाख ७३ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त केली़ या बेहिशेबी रकमेच्या तपासात ही रक्कम सभापती देवीदास पिंगळे यांच्याकडे जाणार असल्याचे पुरावे उपलब्ध झाल्याने त्यांना आज अटक करण्यात आली आहे़

Web Title: Devidas Pingale arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.