देवीदास पिंगळे यांची पोलीस कोठडीत रवानगी

By Admin | Published: December 23, 2016 12:25 AM2016-12-23T00:25:32+5:302016-12-23T00:27:43+5:30

जिल्हा न्यायालय : बंगला, फार्महाउस, फ्लॅट, बॅँक लॉकरची झडती

Devidas Pingale will be sent to police custody | देवीदास पिंगळे यांची पोलीस कोठडीत रवानगी

देवीदास पिंगळे यांची पोलीस कोठडीत रवानगी

googlenewsNext

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळून बेहिशोबी रोकड जमविल्याप्रकरणी अटकेत असलेले सभापती तथा राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास आनंदा पिंगळे यांना गुरुवारी (दि. २२) पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने येत्या रविवारपर्यंत पिंगळे यांना पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणात पोलिसांनी आजवर ८५ साक्षीदारांचे जाबजबाब नोंदविले असून, पिंगळे यांच्या बेनामी संपत्तीचा शोध घेण्यासाठी नाशिकमधील फार्म हाउससह मुंबईच्या फ्लॅटची झाडाझडती पोलिसांनी सुरू केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी पेठरोड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून एका मोटारीतून सुमारे ५७.७३ लाख रुपयांची रोकड हस्तगत करत तिघा संशयिताना अटक केली होती. सदर रक्कम कर्मचारी पिंगळे यांना देण्यासाठी घेऊन जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यासंदर्भात ठोस पुरावे देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे उपलब्ध असल्याने बुधवारी दुपारी पिंगळे यांना अटक करण्यात आली होती. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा सरकार पक्षाकडून बाजू मांडण्यात आली त्यात साक्षीदारांवर सभापतिपदाचे दबावतंत्र वापरण्याचा केला जाणारा प्रयत्न, २०१४ - १५ साली संशयास्पद बॅँक व्यवहार, घरामध्ये मिळून आलेले सोने-चांदीचे दागिने, मुंबईच्या फ्लॅटमध्ये आढळले ९० बनावट मतदान कार्ड, चौकशीदरम्यान सहकार्य न करणे, नऊ कर्मचाऱ्यांच्या खात्यावरील एकूण ४ लाख ७८ हजार रुपयांचा शोध घेणे आदि कारणांसाठी न्यायालयाकडे सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी क रण्यात आली. न्यायाधीश एन. बी. भोस यांनी पुढील तपासासाठी पिंगळे यांना येत्या रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळून आलेल्या ५७ लाख ७३ हजार ८०० रुपयांची रक्कम ११८ कर्मचाऱ्यांची असून, याव्यतिरिक्त नाशिकरोडच्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या नऊ कर्मचाऱ्यांच्या खात्यातून ४ लाख ७८ हजार रुपयांची घेतलेल्या रकमेचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला.

११८० ग्रॅम सोने; १२२० ग्रॅम चांदी जप्तलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पिंगळे यांच्या मालमत्तेची झाडाझडती घेतली जात असून, त्यांच्या राहत्या घरी ‘आनंदा निवास’ येथून पोलिसांनी ११८० ग्रॅम सोन्याचे व १२२० ग्रॅम चांदीची भांडी पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच पिंगळे यांच्या दोन बॅँकांमधील लॉकरची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. एकूणच बेहिशोबी रोकडच्या शोधासाठी पोलिसांकडून त्यांच्या मालमत्तेची झाडाझडती घेतली जात आहे.

Web Title: Devidas Pingale will be sent to police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.