देवळा पोलिस निरीक्षकासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 06:55 PM2019-02-20T18:55:52+5:302019-02-20T18:56:31+5:30
कारवाई : १५ हजारांची लाच स्वीकारताना पकडले
नाशिक : शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी २५ हजाराची लाच मागणारे जिल्ह्यातील देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर नाशिकलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भऊर, ता. देवळा येथील रमेश तानाजी जाधव (वय ३६) यांचे त्यांच्या नातेवाईकांशी शेतीच्या वादातून भांडण झाले होते. यासंदर्भात जाधव यांनी देवळा पोलिसात तक्रार दाखल केलेली होती. त्यांच्यावर पोलीस कारवाई व्हावी यासाठी देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेलार यांनी रमेश जाधव यांच्याकडून पंचवीस हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी नंतर पंधरा हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत जाधव यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रर दाखल केली होती. या तक्ररीवरून बुधवारी (दि.२०) दुपारी साडे तीन वाजता नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले व अपर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम, पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, पोलीस हवालदार वैभव देशमुख, नितीन कराड, शामकांत पाटील, प्रवीण महाजन, संतोष गांगुर्डे, विनोद पवार यांच्या पथकाने कारवाई करून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेलार यांना देवळा पोलीस ठाण्यात पंधरा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत.
सपकाळेंना न्यायालय आवारातून अटक
पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे हे न्यायालयीन कामासाठी नाशिक सत्र न्यायालयात गेले असताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून त्यांना न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेतले. दोघांचीही चौकशी चालू असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .