देवळाली कॅन्टोंमेंट बोर्डाचे उत्पन्न घटले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 06:06 PM2018-10-10T18:06:16+5:302018-10-10T18:08:44+5:30
लष्करी आस्थापनेकडे थकीत असलेले सेवाकररूपी ६५ कोटींपैकी किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळाल्यास येथील रस्त्यांच्या दुरुस्ती कामाला गती मिळेल. तसेच देशभरात सरकारने जीएसटी लागू केला.
देवळाली कॅम्प : लष्करी आस्थापनेकडून येणे असलेल्या ६५ कोटींच्या सेवाकरासह जीएसटी लागू करूनही केंद्र व राज्य शासनाकडून परतावा मिळत नसल्याने प्रतिवर्षी पावणेपाच कोटी रुपयांनी उत्पन्न घटल्याने कॅन्टोंमेंट बोर्डाच्या शिष्टमंडळाने कन्स्ट्रक्शन विभागाच्या नवनियुक्त महासंचालक दीपा बाजवा यांची भेट घेतली.
देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रमुख असलेल्या महासंचालक बाजवा या पुणे येथील दक्षिण विभागाच्या कार्यालयास भेट देण्यासाठी आल्या असता देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष मीना करंजकर, नगरसेवक बाबूराव मोजाड, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, कावेरी कासार, प्रभावती धिवरे यांसह माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, भाऊसाहेब धिवरे आदींच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी देवळालीतील विविध प्रश्नांवर चर्चा करताना दक्षिण विभाग संचालक के.एल. पेगू, संचालक विभा शर्मा, संचालक संजीव कुमार हे उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने देवळालीतील विकासकामांना चालना देणेकामी लष्करी आस्थापनेकडे थकीत असलेले सेवाकररूपी ६५ कोटींपैकी किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळाल्यास येथील रस्त्यांच्या दुरुस्ती कामाला गती मिळेल. तसेच देशभरात सरकारने जीएसटी लागू केला. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला जकातीच्या स्वरूपात मिळणाऱ्या पावणेपाच कोटींची प्रतिवर्षी घट झाल्याचे सांगितले. शासनाकडून हा निधी प्राप्त होणे गरजेचे असून, स्वच्छ भारत अभियानांर्तगत देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने स्वनिधीतून खर्च करीत आधुनिक अशा घंटागाडी व प्रत्येक नागरिकाच्या घरात स्वतंत्र दोन डस्टबिनचे वाटप केल्याचे सांगितले. दरवर्षी शासनाच्या आदेशाप्रमाणे वेळोवेळी स्वच्छता अभियानही राबविले जात आहे त्यासाठी अर्थसहाय्य मिळावे, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा मोफत दिल्या जात असून, दर्जा कायम असल्याने आजूबाजूच्या ३२ खेड्यांतील नागरिकही लाभ घेत आहे. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन प्रस्तावित नव्या इमारतीसाठी १२ कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली तसेच आनंद रोड मैदानावरील आठ एकर जागेत उभारावयाचे क्रीडा संकुलाकामी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी, शहरातील बेरोजगारांसाठी हौसन व वडनेर रोडवरील प्रस्तावित व्यापारी संकुलाला मंजुरी मिळावी आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.