निसर्ग सौंदर्यात भर घालणाऱ्या देवदरीत भाविकांना प्रवेश बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 05:08 PM2020-07-28T17:08:36+5:302020-07-28T17:10:36+5:30
एरंडगाव : नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या देवदरी येथे पुरातन श्री महादेव मंदिर असल्याने श्रावणात भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसह पर्यटकांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एरंडगाव : नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या देवदरी येथे पुरातन श्री महादेव मंदिर असल्याने श्रावणात भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसह पर्यटकांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
निसर्ग सौंदर्यात भर घालणारे देवदरी हे लहानसे गाव येवला तालुक्याच्या पुर्व टोकावर वसलेले आहे. देवदरी हे देवनदीचे उगमस्थान आहे. येथूनच देवनदी उगम पावते आणि तिचे दरीत रूपांतर होते. या दरीत महादेवाचे पुरातन घुमटाकार मंदीर आहे. या दरीमध्ये देवाचे स्थान असल्यानेच या गावाला देवाची दरी यावरु न देवदरी हे नाव पडले असावे असे जुन्या जाणत्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथे श्रावण महिन्यात मोठा यात्रोत्सव भरतो. देवदरी भाविकांच्या, पर्यटकांच्या आगमनाने गजबजुण जाते, परंतु या वर्षी कोरोनामुळे सर्वांनाच प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
नासिक व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर वसलले हे गाव तसे विकासापासुन वंचित असले तरी निसर्गाने या ठिकाणाला भरभरून सौंदर्य दिले आहे. येथे असलेला पुरातन वटवृक्ष, खोल असलेली दरी. दरीच्या दुतर्फा झापुळलेले वृक्ष वेलींचे मांडव व मनाला आकर्षित करणारा पांढराशुभ्र धबधबा, पाण्याने भरलेले लहान लहान बंधारे या निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांना भावतात. देवनदीवर देवनाक्या प्रकल्पाची मागणी करण्यात आलेली असल्याचे प्राचार्य दिनकर दाणे यांनी सांगितले. हा प्रकल्प झाला तर या ठिकाणाला अभयारण्याचा दर्जा प्राप्त होईल. या परिसरात वास्तव्य करणाºया हरण, काळवीट यांना हक्काचे निवासस्थान मिळेल. देवनदी ही तालुक्यातील अशी एकमेव नदी आहे की जी पुढे माणिकपुंजहुन गिरणा व पुढे तापीनदीला मिळून अरबीसमुद्रात विलीन होते. अशा या निसर्गरम्य व धार्मिक स्थळाचा शासनाने विकास करावा अशी मागणी प्राचार्य दाणे व ग्रामस्थांनी केली आहे.