चंदनपुरी येथे खंडोबा यात्रेत भक्तांची मांदियाळी
By Admin | Published: February 2, 2016 10:42 PM2016-02-02T22:42:16+5:302016-02-02T22:42:50+5:30
चंदनपुरी येथे खंडोबा यात्रेत भक्तांची मांदियाळी
मालेगाव कॅम्प : तालुक्यातील श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे मल्हारभक्तांची मांदियाळी सुरू असून, भक्त ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषांनी दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.
प्रतिवर्षाप्रमाणे जेजुरी येथून आणलेली पायी मशाल चंदनपुरीत दाखल झाली. यानंतर खंडोबा मंदिरात मान्यवरांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यंदा यात्रा सुरू झाली त्या दिवसानंतर शनिवार, रविवार या दिवसांखेरीज यात्रेत अपेक्षित गर्दी दिसून आली नाही. शहर,
तालुक्यातील सतत दुष्काळ परिस्थितीचा परिणाम, बेमोसमी पाऊस, थंडीचे कमी-अधिक
प्रमाण यामुळे यात्रेत मल्हार
भक्तांची फारशी गर्दी दिसून आली नाही.
या दोन दिवसांशिवाय यात्रेत हवे तसे मल्हारभक्त तसेच यात्रेत विविध वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या रोडावली. त्यामुळे येथील मंदिर प्रशासन, दुकानदार व व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे, तर इतर सर्व दिवसांना दिवसभर मल्हारभक्तांचा राबता चंदनपुरी यात्रेत दिसून येत आहे. यात्रेत चारशेहून अधिक सर्व
प्रकारची दुकाने, हॉटेल्स्, मनोरंजनाची साधने, पूजेच्या साहित्याचे व भंडाऱ्याची दुकाने थाटली आहेत. या दुकानांवर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
व्हीआयपी दर्शनाची सोय करण्यात आल्याने त्यासाठी १००रुपये मोजावे लागत आहे. यामुळे असंख्य मल्हारभक्तांनी नाराजी व्यक्त
केली. यात्रेतील इतर खेळणी व खाद्यपदार्थांच्या वस्तू या
भाववाढीमुळे मल्हारभक्तांनी यात्रेत आपले हात आखडते घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. यात्रेसाठी जय मल्हार ट्रस्ट व ग्रामपंचायतीतर्फे सर्व सोयी उपलब्ध करून दिल्याचे चंदनपुरीच्या सरपंच योगीता अहिरे, उपसरपंच केतकी पाटील यांनी सांगितले.
यात्रोत्सवासाठी माजी सरपंच राजेंद्र पाटील, मनोहर जोपळे,
सतीश पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर वाघ, सर्व ग्रामपंचायत
सदस्य व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. (वार्ताहर)