मांगीतुंगीत देशभरातील भाविकांचा ओघ सुरूच
By admin | Published: February 23, 2016 11:58 PM2016-02-23T23:58:10+5:302016-02-24T00:04:20+5:30
सहावा दिवस : पुणे, मुंबई, दिल्लीच्या भाविकांनी केला अभिषेक
मांगीतुंगी : येथील भगवान वृषभदेवांच्या विशालकाय मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळा अपूर्व उत्साहात सुरू आहे. मंगळवारी पुणे, मुंबई आणि दिल्ली येथील सुमारे चार हजार भाविकांनी पंचामृताभिषेक केला. त्यानंतर भगवान वृषभदेवांच्या चरणी भाविक लीन झाले. सोमवारी सहाव्या दिवशी पंधरा ते वीस हजार भाविकांनी मांगीतुंगी येथे हजेरी लावली होती.
भगवान वृषभदेवांच्या मूर्ती महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी दोन दिवसांपासून मुंबई, पुणे, दिल्ली येथील सुमारे दहा हजार भाविक मांगीतुंगीत आले आहेत. मंगळवारी सहाव्या दिवशी चार हजार भाविकांनी विधिवत पूजा करून पंचामृताभिषेक केला. मुंबई येथील उद्योगपती सी.पी.कोठारी, डी. पी. कोठारी, पुणे येथील प्रीतम राजेश शहा व दिल्ली येथील निर्मलकुमार शेट्टी यांना काल प्रथम अभिषेक करण्याचा मान मिळाला.
सुवर्ण कलशद्वारा त्यांनी भगवान वृषभदेवांच्या मूर्तीचा पंचामृताभिषेक केला. यावेळी गनिनीप्रमुख ज्ञानमती माता, रविन्द्र्कीर्ती स्वामी यांनी त्यांना आशीर्वाद दिले. दरम्यान सायंकाळी नाशिकचे पोलीस आयुक्त जगन्नाथन यांनीही सपत्नीक मूर्तीची विधिवत पूजा करून सुवर्ण कलशद्वारा पंचामृताभिषेक केला. मूर्ती निर्माण समितीचे महामंत्री संजय पापडीवाल यांनी पोलीस आयुक्त जगन्नाथन यांनी भगवान वृषभदेवाची प्रतिमा देऊन त्याचा सन्मान केला. याप्रसंगी मालेगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस उपाधीक्षक अशोक नखाते, जीवनप्रकाश जैन, विजयकुमार जैन आदी उपस्थित होते. (वार्ताहर)