सोमनाथाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसचा नाशिकमध्ये अपघात; ४१ जण जखमी

By अझहर शेख | Published: January 21, 2024 09:50 PM2024-01-21T21:50:56+5:302024-01-21T21:51:49+5:30

अपघाताची माहिती मिळताच १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणाऱ्या पाच रुग्णवाहिका व १०२ टोल-फ्री क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

Devotees on their way to visit Gujarat's Somnath met with an accident in Nashik | सोमनाथाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसचा नाशिकमध्ये अपघात; ४१ जण जखमी

सोमनाथाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसचा नाशिकमध्ये अपघात; ४१ जण जखमी

नाशिक : पश्चिम बंगालमधून सुमारे ५५ प्रवासी भाविकांना घेऊन निघालेली बस नाशिकमधून देवदर्शन करून पेठमार्गे गुजरातच्या सोमनाथा तीर्थक्षेत्राकडे जात होती. रविवारी (दि.२१) संध्याकाळी पेठजवळ कोटंबी घाटातील धोकादायक चढावर असलेल्या तीव्र वळणावर ही बस (डब्ल्यू बी १९ एच ५७१५) चालकाचा ताबा सुटल्याने उलटली. यामुळे बसमध्ये असलेल्या सुमारे ५५ ते ६० प्रवाशांपैकी ४१ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी २३ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले असून एकूण ३१ रुग्णांवर नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

सोमनाथ मंदिर गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील वेरावळ जवळ प्रभास पाटण येथे समुद्रकिनाऱ्यालगत आहे. पश्चिम बंगालचे भाविक शिर्डीमार्गे नाशिकमध्ये रविवारी सकाळी आले होते. येथील पंचवटी, तपोवन परिसरात देवदर्शन घेतल्यानंतर या भाविकांनी सोमनाथ मंदिराच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. संध्याकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या सुमारास ही बस पेठजवळच्या कोटंबी घाट चढत असताना अखेरच्या टप्प्यावरील तीव्र चढ व धोकादायक वळणावर बसचालकाचा ताबा सुटला. यामुळे बस उलटून अपघात झाला. बसमध्ये बसलेले महिला, पुरुष प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणाऱ्या पाच रुग्णवाहिका व १०२ टोल-फ्री क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळापासून जवळ असलेल्या पेठ ग्रामीण रुग्णालयात गंभीर जखमींना सर्वप्रथम हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय उपचार केल्यानंतर रुग्णवाहिकांमधून पुढील उपचारासाठी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नाशिक शहरातील जिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली. एकापाठोपाठ एक पाच ते सहा रुग्णवाहिकांमधून रुग्णांना दाखल करण्यात आले. तातडीने या सर्व रुग्णांवर येथील आपत्कालीन व अपघात कक्षात उपचार सुरू करण्यात आले. यापैकी १५ ते २० प्रवासी हे गंभीररीत्या जखमी असून यामध्ये महिला भाविकांचाही समावेश असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: Devotees on their way to visit Gujarat's Somnath met with an accident in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात