पंचवटीत भाविक, पर्यटकांची गर्दी
By Admin | Published: May 19, 2014 12:38 AM2014-05-19T00:38:12+5:302014-05-19T01:06:37+5:30
नाशिक : उन्हाळ्याच्या सुट्या आणि नुकतीच लोकसभा निवडणुकीची धामधूम आटोपल्याने नाशिकला तीर्थक्षेत्रानिमित्त येणार्या भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली असून, कपालेश्वर मंदिर, तपोवनात आज भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.
नाशिक : उन्हाळ्याच्या सुट्या आणि नुकतीच लोकसभा निवडणुकीची धामधूम आटोपल्याने नाशिकला तीर्थक्षेत्रानिमित्त येणार्या भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली असून, कपालेश्वर मंदिर, तपोवनात आज भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.
प्रभू रामचंद्र, सीता व लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशकातील पंचवटीला पौराणिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे दर बारा वर्षांनी होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यानेही नाशिक जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे नाशिकला वर्षभर भाविकांची गर्दी असते.
यावेळी लोकसभा निवडणुका ऐन उन्हाळ्यात अन् शालेय सुट्यांचा कालावधी असल्याने अनेकांचे पर्यटनाचे नियोजन कोलमडले. शालेय सुट्या असल्या तरी मुलांसह पालकांना बाहेर निघता आले नाही. त्यामुळे एप्रिलच्या अखेरपर्यंत नाशकात पर्यटकांची वा भाविकांची फारशी गर्दी नव्हती. दरम्यान, गेल्या शुक्रवारी लोकसभा निवडणुकीची धामधूम आटोपताच आज (रविवारी) नाशकात भाविकांची गर्दी दिसून आली.
पंचवटीतील कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महाशिवरात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे भाविकांची गर्दी असते त्याचाच अनुभव आज येत होता. तसेच सीतागुंफा येथेही भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविकांच्या दर्शनासाठी रांगा होत्या. काळाराम मंदिरातही भाविकांची गर्दी दिसून आली. तपोवनातही भाविकांची दिवसभर रीघ लागलेली होती.
विशेषत: उत्तर भारतीय भाविकांसह बिहार, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील भाविकांची आज गर्दी दिसून आली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मराठावाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाविकही यावेळी दिसून आले. विदेशी पर्यटकांनीही लक्ष वेधून घेतले होते. समजेल त्या भाषेत ते पंचवटीतील धार्मिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते. पंचवटीतील रामकंुडात स्नानासाठीही सकाळपासून सायंकाळपर्यंत गर्दी होती. विशेषत: महिला व लहान मुलांची संख्या अधिक होती. येत्या आठवडाभरात भाविकांच्या व पर्यटकांच्या गर्दीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.